esakal | नांदेड - सावधान दुखणे अंगावर काढू नका, उशीरा दाखल झालेल्या रुग्णांचा होतोय मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

 ताप, सर्दी, खोकला, अंग व डोकेदुखी असे लहान सहान वाटणाऱ्या आजाराचे निदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. रुग्णालयात न जाता औषधी दुकानातुन आणलेल्या गोळ्या औषधे घेऊन दुखणे अंगावर काढत आहेत.

नांदेड - सावधान दुखणे अंगावर काढू नका, उशीरा दाखल झालेल्या रुग्णांचा होतोय मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - ताप, सर्दी, खोकला झाला की अंगावर दुखणे काढणाऱ्यांची संख्या अजूनही अधिक आहे. त्यामुळे असे रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतर उशीरा रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असतील तर सदरील रुग्ण गंभीर होतो. त्यामुळे उशीरा दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यूच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका. लक्षणे दिसल्यास त्वरीत चाचणी करा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अनेक रुग्ण कोरोना आजाराला घाबरत आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंग व डोकेदुखी असे लहान सहान वाटणाऱ्या आजाराचे निदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. रुग्णालयात न जाता औषधी दुकानातुन आणलेल्या गोळ्या औषधे घेऊन दुखणे अंगावर काढत आहेत. तात्पुरत्या स्वरुपात दुखणे कमी वाटत असले तरी, अंगातला आजार पूर्णपणे बरा होताना दिसत नाही. 

हेही वाचा- वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले​

उशीरा लेल्या ज्येष्ठांकडून औषधोपचापास प्रतिसाद कमी

तेव्हा घाबरलेले नागरिक तसेच वयोवृद्ध रुग्णालयात येत आहेत. रुग्णालयात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्यास त्यांच्यावर उपचार करताना त्यांच्याकडून उपचारास हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 

हेही वाचले पाहिजे- हवेत गोळीबार करून चोरट्यांनी सराफ व्यापाऱ्यास लुटले

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी झाल्याचा दावा

सध्या कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा जिल्ह्यातील आकडेवारी अडीच टक्के इतका असून, आॅगस्टपर्यंत हा दर पाच टक्क्यापेक्षा अधिक होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची मालिका कधी थांबणार? हा आरोग्य यंत्रणेसमोर सर्वात मोठा प्रश्‍न होता. परंतु काही दिवसांपासून शहर आणि गाव पातळीवर डॉक्टर, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका अशा विविध कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाची लागण असल्याचे वेळीच लक्षात येत असल्याने त्या बाधितावर नजिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर वेळेत उपचार केले जात असल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी झाल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. 

 उपचारासाठी वेळेत रुग्णालयात या

अनेकजण कोरोना आजाराला घाबरत आहेत. रुग्णालयात येऊन कोरोना चाचणी करण्याऐवजी जुजबी गोळ्या, औषधे घेऊन वेळ मारुन नेत आहेत. अशा रुग्णांना कोरोनाची अतिलक्षणे दिसू लागल्यानंतर ते रुग्ण रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे अशा उशीराने आलेल्या रुग्णांवर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड. 

 

loading image