अन् शेकडो किलोमीटरची पायपीट थांबली

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 12 May 2020

अर्धापूर येथून २२ मजुरांना एसटी बसमधून मंगळवारी (ता. 12) सायंकाळी रवाना करण्यात आले आहे. यात मध्यप्रदेशमधील १६, तर उत्तरप्रदेशमधील सहा मजुरांचा समावेश आहे. प्रशासनातील अधिकारी देवदूतासारखे धावून आल्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास सुखकर झाल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.

अर्धापूर, (जि. नांदेड) ः आपल्या स्वगृही पायी जाणाऱ्या मजुरांसाठी प्रशासन पुन्हा मदतीला धावून आले असून अर्धापूर येथून २२ मजुरांना एसटी बसमधून मंगळवारी (ता. 12) सायंकाळी रवाना करण्यात आले आहे. यात मध्यप्रदेशमधील १६, तर उत्तरप्रदेशमधील सहा मजुरांचा समावेश आहे. प्रशासनातील अधिकारी देवदूतासारखे धावून आल्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास सुखकर झाल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी बिस्किटे वाटप केली.

 

हेही वाचा -  हातातोंडाशी आलेली आमदारकी गेली, तरी गोपछडे म्हणतात...

 

कोरोनामुळे देशभर लाॅकडाउन सुरू आहे. याचा मोठा फटका मजुरांना बसला आहे. राज्यत अडकलेले मजूर घराच्या ओढीने शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पायी निघाले आहेत. नांदेड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशमधील २१ मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले होते. ते पायी जात आसतांना परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या मजुरांना अर्धापूर येथील बसस्थानकात थांबविण्यात आले. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अविनाश मोरे, डाॅ. रवी मोरे यांनी वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र दिले. तर नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी मजुरांच्या पास तयार केल्या. 

 

नांदेडचे आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे, बसस्थानक प्रमुख राजकुमार, संजय वाबळे यांनी बसची व्यवस्था केली. चालक डी. बी. वाळके, आर. एन. रोडे यांनी बस क्रमांक (एमएच २० - बीएल ३१४७) मजुरांना घेऊन रवाना झाले. परिवहन अधिकारी जी. बी. डाईफोडे यांनी प्रवासाच्या परवानगीची व्यवस्था केली. तर सामाजिक कार्यकर्ते गुणवंत वीरकर, बालाजी गंधनवाड, लक्ष्मीकांत मुळे यांनी बिस्किटे दिली. या वेळी डाॅ. विशाल लंगडे, सोनाजी सरोदे, रणधीर लंगडे, आमृता खोंडे आदी उपस्थित होते.

 

परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी शासनाने निर्णय घेतला असून निशुल्क प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी महसूल, आरोग्य, परिवहन व एसटी महामंडळ या चार विभागांत समन्वय आवश्यक आहे. घरी पायी जाणाऱ्या मजुरांना अर्धापुरातून दुसरी बस सोडण्यात आली आहे. परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात संपर्क करणे आवश्यक आहे. त्यानंतर चार विभागांच्या समन्वयातून बस उपलब्ध करून देण्यात येईल.
- पुरुषोत्तम व्यवहारे, आगारप्रमुख. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government To Allow Workers To Go To Their Villages, Nanded News