पदवीधर मतदारसंघ- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नऊ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य 

प्रल्हाद कांबळे
Monday, 30 November 2020

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात.

नांदेड :-  मंगळवारी (ता. एक)  होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त काही कागदपत्रांचा आधार घेऊन मतदान करता येणार आहे.

या कार्डचा घेता येणार आधार

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.

हेही वाचा -  नांदेडकरांसाठी गुड न्यूज : रक्त पिशवीच्या दराबाबत आता दर निश्चित -

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे ता..10 नोव्हेंबर रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे उपआयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate Constituency- Nine documents in addition to voter identity card are admissible as evidence nanded news