ग्रामपंचायत निवडणुकीत पैसा झाला मोठा, विकास, विचार झाला छोटा

लक्ष्मीकांत मुळे
Thursday, 21 January 2021

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वीस ते तिस लाखाच्यावर खर्च करण्यात आला. तसेच मद्य, पैसा वाटप आदी अपपृतीने गावच्या विकासाची घडी विस्कटत आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) :  महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहिले. स्वयंपूर्ण खेडी झाली तरच देश मजबूत होईल अशी त्यांची धारणा होती. ही विचारधारा काही दशके चालली. पण सध्या गावखेड्याचे अर्थकारण, राजकारण पार बदलून गेले आहे. एक हजार मतदार असलेल्या छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वीस ते तिस लाखाच्यावर खर्च करण्यात आला. तसेच मद्य, पैसा वाटप आदी अपपृतीने गावच्या विकासाची घडी विस्कटत आहे. तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय भावकीत वैर निर्माण होत आहे ही बाब तर निराळीच आहे. नको त्या निवडणुका अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानल्यामुळे या निवडणुकीत सर्वच पॅनल प्रमुखांनी सर्व प्रकाराचे हातखंडे वापरली आहेत. त्यामुळे सब घोडे बारा टक्के म्हणावे लागत आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये निवडूण देण्यात येणारे सदस्य अभ्यासु, गावाच्या विकासासाठी जाण व तळमळ असणारे सदस्य असावेत. पण हा विचार मागे  पडत आहे. ग्रामपंचायतीवरील निवडणूकीचे चित्र पाहता प्रामाणिक कार्यकर्ते या निवडणुकीपासून चार हात दुर राहण्याचे पसंत करित आहेत.

तालुक्यातील छोट्या- छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पैसा पाण्यासारखा खर्च करण्यात आला. काही गावात तर मतदारांच्या सरळ बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात आल्याची चर्चा आहे. तर काही गावात एक हजारापासुन ते तीन हजारपर्यंत पैसा वाटप करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत 30 ते 40 लाखांच्यावर खर्च होत असेल तर त्या गावात विकास कामे कशी होणार व त्याचा दर्जा कसा राहणार या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. ज्या मतदारांनी मतासाठी मोबदला घेतला त्या मतदारांचे कामे करण्यात ग्रामपंचायत सदस्यांना किती आनंद वाटणार आहे. पराभवाचे दुःख नाही, विजयाचा आनंद नाही अशी परिस्थिती आहे. तर भोकर विधानसभा मतदार संघात जो विजयाचा मुदखेड पॅटर्न  काही वर्षांपूर्वी राबविला. त्याच झाडाची कटू फळे स्थानिक पदाधिका-यांना भोगावी लागत आहेत. आशी कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gram Panchayat elections, money became big, development became small nanded news