
नांदेड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १३७ टक्क्यानुसार एक लाख ९२ हजार १८० हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नांदेड : यंदाचा समाधानकारक पाऊस आणि प्रकल्पात असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९२ हजार १८० हेक्टरनुसार १३७.०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात हरभऱ्याची पेरणी एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर झाल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरुन निघावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र या वर्षी तीन लाख हेक्टरवर वाढविण्यासाठी नियोजन केले होते. कृषी विभागाने रब्बीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच खताचे नियोजन केले होते. जिल्ह्याचे रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार हेक्टर एवढे आहे. तर यात हरभरा पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ८८ हजार हेक्टर आहे. आजपर्यंत सरासरीच्या १३७ टक्केनुसार एक लाख ९२ हजार १८० हेक्टरवर रब्बीमध्ये पेरणी झाली आहे.
हेही वाचा - नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु
यात सर्वाधिक एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर हरभरा पेरला आहे. यासोबतच रब्बी ज्वारी २१ हजार ४०६ हेक्टर, गहू ११ हजार ४६१ हेक्टर, रब्बी मका एक हजार ५७६, करडई दोन हजार ३२१, रब्बी तीळ सहा, जवस नऊ हेक्टरवर झाल्याची माहिती रविशंकर चलवदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी करावी तसेच उन्हाळी हंगामात उन्हाळी ज्वारी भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी असे आवाहन रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
हे देखील वाचाच - नांदेड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
रब्बी पिकांच्या क्षेत्रात होतेय वाढ
सध्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत असल्याने रब्बी पिकांसह बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.