नांदेडमध्ये गुटखा माफियांची चलती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

पोलिसांच्या कारवाईत लाखोंचा अवैध मार्गाने जाणारा बंदी असलेला गुटखा जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्यास कारवाई. पोलिस व अन्न आणि औषद प्रशासनाचा इशारा  

नांदेड : नांदेड शहर हे अवैध गुटखा विक्रीचे माहेरघर बनले असून देगूलर नाका परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटखा बाहेर जिल्ह्यात जात आहे. पूर्वी शहरात तेलंगना, कर्नाटक या राज्यातून गुटख्याची तस्करी होत होती. मात्र आता नांदेड शहरातूनच बाहेर गुटखा जात असल्याने गुटखा तयरा करण्याचा काराखाना झाला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस अवैध गुटख्यावर कारवाई करून लाखोंचा गुटखाजप्त करीत आहेत. मात्र हे दोन्ही विभाग या गुटख्याच्या मुळात जात नसल्याने वारंवार अशा घटना घडत आहेत. 

देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये वजीर गुटखा ४० बोरी प्रत्येक बोरीमध्ये सहा छोट्या बॅग, बॅगमध्ये ५४ पॅकेट असे एकत्रीत १२ हजार ९६० पॅकेट किंमत एकुण १९ लाख ४४ हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

हेही वाचा -  देणगीतून उभारली आंतरराज्य पोलिस चौकी

दोघांवर गुन्हा दाखल

देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक (एमएच १८- एए- १६६६) या वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाची ता. १२ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी ही तपासणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसखान व कंधार तालुक्यातील गउफळ आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले (वय ५०) यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितास आजीवन तुरुंगवास आणि १० लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

एफडीआय आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, पोलिस उपनिरीक्षक एम. एस. ठाकूर तसेच हवालदार श्री. लुंगारे, श्री. यमलवाड यांचे सहकार्याने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha mafia in Nanded