नांदेडला पावणेतीन लाखांचा गुटखा पकडला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

नांदेड शहरात मालेगाव रस्त्यातील एका कॉम्प्लेक्समध्ये प्रतिबंधित असलेला दोन लाख ७९ हजार २३४ रुपयांचा तंबाखुजन्य पदार्थ (गुटखा) अन्न व औषधी प्रशासनाने शनिवारी (ता. २०) पकडला.

नांदेड - मालेगाव रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या दोन लाख ७९ हजार २३४ रुपयांचा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या हेतूने बाळगलेला आढळून आला. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी या बाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अंगद अशोक पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. भोसले करीत आहेत. 

हेही वाचा - नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा  

अभ्यासिका फोडून ४३ हजाराची चोरी
नांदेड शहरातील नवा मोंढा येथे एस. आर. अकेडमी व छत्रपती अभ्यासिका आहे. या ठिकाणी चोरट्यांनी दरवाज्याचे कुलुप तोडून प्रवेश केला. आतमधील फॅन, खुर्ची, कुलर, बाकडे असा एकूण ४३ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार ता. १५ ते ता. १९ जून दरम्यान घडला. याबाबत जितेंद्र नामदेव (रा. चैतन्यनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार गोटमवाड करत आहेत.

एसटी बसचालकास मारहाण
सीताखांडी घाटात (ता. भोकर) येथे एसटी महामंडळाचे बसचालक अर्जुन गीते हे शनिवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ वाजता शासकीय काम करत होते. त्यावेळी आरोपितांनी संगनमत करुन त्यांची बस थांबवली. त्यानंतर त्यांच्या शर्टाला पकडून खाली उतरवले आणि थापडबुक्यांनी मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार जाधव करत आहेत.

जुगार खेळणाऱ्यांकडून दोन लाख चार हजार जप्त
कापशी बुद्रुक (ता. लोहा) येथे शनिवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्या ठिकाणी विना परवाना बेकायदेशिररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. तोंडावर मास्क नव्हता तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन घातक कृती करताना मिळून आले. त्यांच्याकडील नगदी व जुगाराचे साहित्यासह दोन लाख चार हजार ४३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार महेबुब बेग करत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबर 
 

महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
मुदखेड शहरातील कुशनगर येथील पद्मिनबाई गोविंद जाधव (वय ४५) या महिलेला साप चावल्याने शुक्रवारी (ता. १९) विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस नाईक डब्ल्यू. के. कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरुन मुदखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

विहीरीत बुडून महिलेचा मृत्यू
डोंगरगाव (ता. हदगाव) येथील अलका रामराव मिसाळ (वय २५) या विवाहितेचा तिच्या शेतातील विहिरीमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरील घटना शुक्रवारी (ता. १९) संध्याकाळी घडली असून याबाबत रामराव मिसाळ यांनी दिलेल्या माहितीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha worth Rs 53 lakh seized in Nanded, Nanded news