‘शिक्षक मित्र’ ठरताहेत ज्ञानदूत- अब पढेगा इंडीया, आगे बढेगा इंडीया

file photo
file photo

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : ऑनलाईन शिक्षणात येणारे अनेक अडथळे सोडविणे एकदम शक्य नसल्याने ती पद्धत बहुतेक ग्रामीण भागात व डोंगरी गावांमध्ये किचकट ठरत आहे. मात्र माहूर पंचायत समितीमध्ये येणारे रूपानाईक तांडा या गावात ज्ञानाचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत. गावात शालेय मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा रूपानाईक तांडा येथील एक माजी विद्यार्थीनी धनश्री मुरली पवार सद्धस्थितीत स्वयंप्रेरणेने ‘शिक्षक मित्र’ या संज्ञेला सार्थ ठरवत शालेय विद्यार्थ्यांना नियमित व शालेय मुख्याध्यापकांच्या सुचनांचं पालन करत व सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ज्ञानदानाचे कार्य करत आहे. जी खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे.

माहूर हा अतिदुर्गम आणि डोंगरी म्हणून गणला जाणारा तालूका. या तालूक्यातील बरेच असे गावं आहेत जिथे पोचणे अवघड जाते. त्यात कोरोना संक्रमणाच्या काळाया आजाराने थैमान घातले आहे. त्यात शाळा सुरू करणेही अवघड होऊन बसलेले असताना शासन निर्देश आहेत की, प्रत्यक्ष शाळा न भरवता केवळ ऑनलाईन आणि प्रसंगी आणि परिस्थितीनुरूप ऑफलाईन शिक्षण घेत विद्यार्थी शिक्षणप्रवाहात आणण्याचा प्रयत्न व्हावा असे संकेत आहेत.

बहुतांशी मुले ही शेतकरी, मजूरदार वर्गाची 

रूपानाईक तांडा हे प्रामुख्याने पूर्णतः बंजारा बहुल असून कष्टकरी लोकांचं एक छोटसं गाव आहे. येथे शिकणारी बहुतांशी मुले ही शेतकरी, मजूरदार वर्गाची आहेतच. शिवाय प्रत्येक पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाही. त्यामुळे शासन निर्देशानुसार ऑनलाईन शिक्षण अध्यापन- अध्ययन प्रक्रियेत असंख्य अडचणी आहेत. अशातच स्वयंप्रेरणेने धनश्री मुरली पवार ही विद्यार्थिनी ज्ञानदानासाठी पुढे आलेली आहे. कु. धनश्री ही सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळात गावातील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितता पाळत आळीपाळीने गटागटात विषयानुरूप व वर्गानुरूप शिकवते. तिला या कामात तिचे पालकसुद्धा प्रोत्साहीत करत आहेत.

‘शिक्षक मित्र’ ही संकल्पना सर्वच गावात राबवावी 

सुरवातीला अनेकांच्या बोचऱ्या टिकेला सामोरे जात या मुलीने आपले काम सुरू केले. पण हळूहळू तिने सर्वांची मने जिंकत अनेकांना बुचकळ्यात टाकत आपलं काम नेटानं पुढे नेलेलं आहे. तिच्या या सहकार्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास तर मदत झालीच आहे. शिवाय अभ्यासाबद्दल व शिक्षणाबद्दल प्रचंड आवड निर्माण करण्यात तिला यश प्राप्त झाले आहे. धनश्री सारख्याच अनेक सुशिक्षीत मुला- मुलींनी ईतरही ठिकाणी अशाच प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी असे तर बोललेच जात आहे. शिवाय शिक्षक मित्र ही संकल्पना सर्वच गावात राबवावी असा आशावाद निर्माण होत आहे. आणि बोललं जात आहे की, ‘अब पढेगा इंडीया’.

शासनाने शिक्षक मित्र नेमून अध्ययन- अध्यापनाचे संकेत दिले 

रूपानाईक तांडा सारख्या दुर्गम तांड्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण काळात शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे अत्यंत क्लिष्ट आहे. येथिल शेतकरी कुटूंबातील जेमतेम परिस्थिती असणाऱ्या मुला- मुलींना मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन अध्यापन कठीण आहे. या परिस्थितीत शासनाने शिक्षक मित्र नेमून अध्ययन- अध्यापनाचे संकेत दिले आहेत. त्याच अनुषंगाने जि. प. प्रा. शाळा रूपानाईक तांडा येथिल माजी विद्यार्थिनी धनश्री मुरली पवार हिने शिक्षक मित्र म्हणून पुढाकार घेतला. तिला योग्य ती मदत व दिशानिर्देश करत शाळेचे सहकार्य आम्ही देत आहोत. तसेच आठवड्यातून दोन -तिन भेटीतून आम्ही योग्य ते मार्गदर्शन करतोय. 
- मिलींद कंधारे, मुख्याध्यापक, रूपा नाईक तांडा.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com