अर्धवट लॉकडाऊनमुळे हदगांव- निवघ्यातील व्यापारी संभ्रमात, निर्बंध वाऱ्यावर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आवश्यक सेवा व्यापार सुरु असलेल्या ठिकाणी व भाजीमार्केटमध्ये कोणतेही निर्बंध पाळण्यात येत नसल्यामुळे या लॉकडाऊनचा फायदा होणार नाही असा स्पष्ट आरोप नागरिक करत आहेत.

अर्धवट लॉकडाऊनमुळे हदगांव- निवघ्यातील व्यापारी संभ्रमात, निर्बंध वाऱ्यावर 

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध या गोंडस नावाखाली 'ब्रेक द चैन' नावाने अर्धवट लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने प्रसिद्धी केली नसल्यामुळे सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आली होती. आवश्यक सेवा व्यापार सुरु असलेल्या ठिकाणी व भाजीमार्केटमध्ये कोणतेही निर्बंध पाळण्यात येत नसल्यामुळे या लॉकडाऊनचा फायदा होणार नाही असा स्पष्ट आरोप नागरिक करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आदेश लॉकडाऊन नाही असा संदेश देणारा होता. आणि त्यामुळेच जनतेमध्ये या लॉकडाऊनविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी हदगाव, निवघा शहरातील संपूर्ण दुकाने सकाळी उघडली होती. हे समजल्यानंतर दुपारी तहसीलदार जीवराज डापकर यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कोणकोणते दुकानावर प्रतिबंध आहे हे जाहीर केले. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या व्यापाऱ्यांनी अर्धवट लॉकडाऊन व न पाळले जाणारे निर्बंध याविषयी तहसीलदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न केले असता ते कोनाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज फक्त  जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकाची माहिती देण्यासाठी आपणास बोलावले आहे. त्यामुळे सर्वांनी  ऐकून घ्यावे असे डापकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - Motivational Story:जिद्दीने गाठले यशाचे शिखर; नांदेडच्या शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात

परिणामी शहरात पसरणारा कोरोना व्हायरसचा धोका यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अधिकच पसरणार हे अधोरेखित झाले. भाजी मार्केटमध्ये एकही भाजी विक्रेता तोंडाला मास्क लावत नाही. लावला तरी तो हनुवटीच्या खाली काढलेला असतो. तसेच हे व्यापारी प्लॅस्टिकच्या थैलीचा वापर करुन त्यात थैलीमध्ये तोंडाने हवा भरल्याच्या अविर्भावात कोरोनाचा फैलाव करण्याचे काम करत आहेत. भाजी व्यापारी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये तोंडाने हवा फुकून नंतर भाजीपाला टाकतात तसेच फळांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असल्यामुळे कोरोनाचे अस्तित्व नाकारणाऱ्या या वर्गाकडून समाजाचे फार मोठे आरोग्य विषयक नुकसान होत असल्याचे दिसून येते. 

कालच हदगाव येथील रुग्णालयात चार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील नागरिक धास्तावलेले अवस्थेत आहेत. तर व्यापार बंद झाल्यामुळे कपडे, कापड,  इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स, सि.एस.सी. केंद्रचालक, बूट-चप्पल,  मोबाईल शॉपी, हार्डवेअर, सिमेंट गजाळी, भांडी स्टोअर व जनरल आणि गिफ्ट सेंटर इत्यादी व्यापाऱ्यांवर  बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दुकानाचे भाडे, बँकेचा हप्ता, नोकरांचा पगार, लाईट बिल व इतर खर्च हा तर बंद होणार नसून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी व्यापारी वर्गातून मागणी करण्यात येत आहे.  काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात याबाबतीत ई- मेलद्वारे मागणी केलेली आहे. बांधकाम व्यवसाय सुरु ठेवण्यात येईल असे सांगण्यात येत असले तरी सिमेंट व गजाळीची दुकाने  बंद ठेवण्यात आल्यामुळे बांधकाम ठप्प झालेले आहे. 

त्यामुळे बांधकाम व्यवसाय करणारे मजूर व यासोबतच इतर कामे करुन ऊपजिवीका करणारे जसे मोटार सायकल दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, कूलर दुरुस्ती, टीव्ही दुरुस्ती इत्यादी हातावर पोट असलेल्या व्यवसायिकांना उपासमारीचा सामना करावा लागणार आहे. परंतु खरे कोरोना पसरवणाऱ्या लोकांवर मात्र स्थानिक प्रशासनाने व पोलिसांनी कोणतेही निर्बंध पाळण्यावर जोर दिला नाही तर एक महिन्यात काय दहा महिने तरी लॉकडाऊन ठेवला तरी कोरोना नियंत्रणात येणार नाही असे नागरिकांतून बोलले जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या नियमानुसारच व्यापार करावा
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे व आपले आणि कुटुंबाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला मदत करावी प्रत्येकांनी मास्कचा व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा तसेच शक्य तिथे साबणाने हात धुऊन आणि सामाजिक अंतर राखून अत्यावश्यक कामासाठीच फक्त बाहेर पडावे. हे दिवसही निघून जातील असा धीरही त्यांनी नागरिकांना व व्यापार्‍यांना दिला. तसेच रस्त्यावर किंवा मधोमध भाजीचे गाडे लावून व्यापार करणाऱ्या लोकांना फक्त भाजी मार्केटमध्येच आणि प्रत्येक दुकानांमध्ये योग्य अंतर ठेवून व प्रशासनाने दिलेल्या नियमानुसारच व्यापार करावा. 
- नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार हदगाव

शहरात एक दोन ठिकाणी तरी बाजारात येणाऱ्या लोकांना अचानक गाठून त्यांचे नमुने घेऊन कोविड टेस्ट करावी. यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्फत आरोग्य प्रशासनाला कळवले.
- गजानन पाटील मनुलकर, कार्यकर्ता काँग्रेस 

तालुक्यातील व्यापारी संघटनांनी या लाॅकडाउन विषयी विरोध दर्शवला आहे

मागिल वर्षीच्या लाॅकडाउन संकटातून आम्हा व्यापारी बांधवांची गाडी आता थोडी थोडी रुळावर येईल अश्या आशा मनामध्ये पल्लवित होत होत्या. त्या आधिच पुन्हा एकदा रुळावर येवु लागलेल्या गाडीला  लाॅकडाउन रुपी ब्रेक लागतोय पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात लाॅकडाउन चे काळे ढग आमच्या व्यापारावर घोंगावत आहेत. हदगाव तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने आशा पध्दतिने लाॅकडाउन लावणे योग्य नसल्याचे सांगून तालुक्यातील व्यापारी संघटनांनी या लाॅकडाउन विषयी विरोध दर्शवला आहे प्रशासनाने आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्वच नियमांचे पालन आम्ही केले आहे व करत आहोत या लाॅकडाउन मुळे व्यापारी बांधवांवर प्रचंड आर्थिक संकट येईल. या कठोर निर्बंधाचा फटका ज्या व्यापारी बांधवांना बसणार आहे या नैसर्गिक संकटातून व्यापारी बांधवांना वर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहिर करुन या लाॅकडाउन च्या निर्णयाचा फेर विचार करावा
- भगवानराव शिंदे, अध्यक्ष, व्यापारी असोशिएशन, निवघा बाजार

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Hadgaon Nivagha Traders Confusion Due Partial Lockdown Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BankCongressNandedHadgaon