हात कपाळावर अन् डोळे आभाळाकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020


कंधार तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा विचार करता कुरुळ्यात आतापर्यंत सर्वात कमी केवळ ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याने आगामी काळातही बऱ्यापैकी पाऊस होईल या अपेक्षेसह बळिराजाने चाड्यावर बियाणाची मूठ ठेवली. जमिनीतील अत्यल्प ओलाव्यावर काही बीजे अंकुरत पात्यावर आली, तर काही शेतजमिनीतच पावसाअभावी उगवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कुरुळा, (ता.कंधार, जि. नांदेड) ः यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीला मृग नक्षत्रात जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने आतापर्यंत पेरणीची जवळपास ८० टक्के कामे झाली. बळिराजाने महागडी बियाणे, खत खरेदी करून काळ्या आईची ओटीही भरली. परंतु, मागील पंधरवड्यापासून शिवारात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत हात कपाळावर, तर डोळे आभाळाकडे लागले आहेत.

हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात सहा पॉझिटिव्ह, तर १७ वा बळी...

कंधार तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा विचार करता कुरुळ्यात आतापर्यंत सर्वात कमी केवळ ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याने आगामी काळातही बऱ्यापैकी पाऊस होईल या अपेक्षेसह बळिराजाने चाड्यावर बियाणाची मूठ ठेवली. जमिनीतील अत्यल्प ओलाव्यावर काही बीजे अंकुरत पात्यावर आली, तर काही शेतजमिनीतच पावसाअभावी उगवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मृग नक्षत्रात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीचा जुगार खेळला, परंतु आर्द्रा नक्षत्र कोरडेच जात असल्याने चिंता वाढल्याचे चित्र आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने बोटभर वर आलेली खरिपाची पिके दुपारच्या उन्हात सुकत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मागील पाच ते सहा दिवसांपासून कुरुळ्यात उन्हाची तीव्रता वाढली असून प्रचंड उकाडा वाढला होता. रविवारी (ता. २८) रात्री दीड वाजेच्या सुमारास चार मिलिमीटर पाऊस झाल्याने सुकणाऱ्या पिकांना थोडेसे का होईना जीवदान मिळाले असले तरी पिकांच्या समृद्ध वाढीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाच दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग भरून येत आहेत, मात्र बरसल्याविनाच जात असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

बी-बियाणे मातीमोल तर होणार नाही ना
हजारो रुपये खर्च केलेले बी-बियाणे मातीमोल तर होणार नाही ना, आशा आशयाचे भाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळताना दिसत आहेत. कुरुळ्यातील शेतकऱ्यांची केवळ कोरडवाहू शेतीवर उपजीविका असल्याने अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून ऐन गरजेच्या वेळी पावसाने हात आखडता घेतला. तरीही पाऊस येईल या आशेवरती ठिकठिकाणी अंतरमशागतीच्या कामाला वेग आला आहे. यंदाचा हंगाम भरभरून देईल, मागील पाच वर्षांचा आर्थिक पीळ निघण्यास मदत होईल, या अपेक्षेसह शेतकरी मेघराजाला विनवणी करण्यापलीकडे काहीही करू शकत नसल्याचे दृश्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hands On Forehead And Eyes Towards Sky, Nanded News