सोशल मीडियावर शेतकऱ्याने केली जाहिरात; अन थेट शिवारातूनच होतेय सिताफळाची विक्री !

Hanumant Rajegore, an agricultural graduate from Shelgaon, has increased the area under custard apple.jpg
Hanumant Rajegore, an agricultural graduate from Shelgaon, has increased the area under custard apple.jpg

अर्धापूर (नांदेड) : सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांचा शोध घेत आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेलगाव (ता. अर्धापूर) येथील कृषी पदवीधर शेतकरी हनुमंत राजेगोरे यांनी सीताफळ लागवडीचा पर्याय निवडला आहे. विक्रीसाठी व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक यांसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करतात. नांदुसा हे गाव नांदेड शहराजवळ असल्याने अनेक ग्राहक शेतातून ताजी सीताफळे खरेदी करत आहेत. तसेच इतर मोठ्या शहरातील अन्य बाजारपेठांमध्येही बॉक्स पॅकिंगसह विक्री करण्याचे त्यांचे नियोजन सुरू आहे. सीताफळ लागवड क्षेत्राचा विस्तार कमी सिंचन, माफक उत्पादन खर्च आणि तुलनेने शाश्वत उत्पादन यामुळे हनुमंतरावांनी सिताफळाच्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली.

उत्पादन व लागवडी खर्च

उत्पादन खर्च को रोपांच्या किंमतीसह लागवडीचा खर्च प्रतिरोप साधारणपणे १०० रुपये इतका होतो. आंतरपिकाची लागवड सीताफळ बागेत केली जाते. त्यासाठी केलेल्या मशागत, खत व्यवस्थापनाचा बागेला फायदा होतो. वेगळे व्यवस्थापन करावे लागत नाही. पहिली दोन वर्षे शेडा छाटणी करावी लागते. ती स्वतः काळजीपूर्वक करतो. बागेमध्ये फुलोऱ्यानंतर ५ ते ६ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एकरी ४ ते ५ हजार रुपये खर्च होतो. बेसल डोससह ठिबकद्वारा विदाका खतांचा एकरी एकूण खर्च २० हजार रुपये होतो. फळबागेसह अन्य शेतीमध्ये काम करण्यासाठी तीन मजूर आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये प्रतिवर्ष मजुरी दिली जाते.  

शिवारातूनच होतेय विक्री...

२०१६ मध्ये सीताफळांचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला नांदेड येथील मार्केटमध्ये स्वतः नेऊन विक्री केली. पहिल्या वर्षी मिळालेल्या १० क्विंटल उत्पादनाला सरासरी ८० रूपये प्रतिकिलो असा दर मिळाला. दुसऱ्या वर्षापासून व्यापारी त्यांच्या शेतातून सीताफळाची खरेदी करतात. २०१७ मध्ये १४ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो सरासरी १०० रुपये दर मिळाला. २०१८ मध्ये ३० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलोला सरासरी ११० रुपये दर मिळाला.

गतवर्षी सरासरी १२५ रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळाला. यंदाही अतिपावसामध्ये चांगले उत्पादन येणे अपेक्षित आहे. विक्रीसाठी व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक यांसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करतात. नांदुसा हे गाव नांदेड शहराजवळ असल्याने अनेक ग्राहक शेतातून ताजी सीताफळे खरेदी करतात. आठ एकर पैकी तीन एकर क्षेत्रावरील माल काढणीस सुरुवात झाली असून सात ते आठ टन उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. यावर्षी 80 ते 90 रुपये प्रतिकिलो दर मिळत असून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षीत असल्याचे यावेळी राजेगोरे यांनी सांगितले.

टप्प्या-टप्प्याने वाढवले क्षेत्र

सीताफळ लागवड क्षेत्राचा विस्तार कमी सिंचन, माफक उत्पादन खर्च आणि तुलनेने शाश्वत उत्पादन यामुळे हनुमंतरावांनी सिताफळाच्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. २०१७ मध्ये सीताफळाची ३ एकर १० गुंठे क्षेत्रावर ११०० झाडांची लागवड केली. गेली दोन वर्षे या पिकामध्ये सोयाबीन व हळदीचे आंतरपीक घेतले. सोयाबीननंतर रब्बीमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले. आत्मविश्वास वाढल्याने २०१९ मध्ये ३ एकर २० गुंठे क्षेत्रावर आणखी सीताफळ लागवड केली. त्यांच्याकडील सीताफळाचे क्षेत्र ८ एकरांवर पोहचले आहे .

गावरान सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर बाजरात विक्री

बागेत कामगंध सापळे लावतात. सोबतच रान तुळशीची लागवडही बागेमध्ये केली आहे. ढगाळ वातावरणाचा फळांच्या उत्पादनावर होते. सीताफळाचा काढणी हंगाम दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असतो. आम्ही साधारणपणे गावरान सिताफळचा हंगाम संपल्यानंतर येण्यासाठी बागेची छाटणी करून विक्रीचे नियोजन करतो. सीताफळाची तोडणी केल्यानंतर क्रेटमध्ये भरून विक्रीस पाठविली जातात. एलएमके १ या वाणाची सीताफळे हिरव्या, पिवळसर रंगाची असून, कवच तुलनेने टणक असते. परिपक्व काढणीनंतर फळ पाच सहा दिवस टिकून राहते. गावरान वाणाच्या तुलनेत गराचे प्रमाणही अधिक असल्यामुळे ग्राहकांची अधिक पसंती मिळते असे हानुमंत राजेगोरे म्हणाले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com