नांदेड : शुक्रवारी (ता. एक जानेवारी) जुने वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना मागील वर्षी कोरोना आजाराशी दिलेला लढा नजरेसमोर तराळून गेला. जिल्ह्यात या महामारीने ५७३ बळी घेतले आहेत. गेल्या दहा महिन्यात अनेकांनी कोरोनावर मातसुद्धा केली आहे. आता येणारे नवीन वर्ष तरी सुखा, समाधानाने जाण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
देशात पहिला कोरोना रुग्ण ता. ३० जानेवारी रोजी आढळून आला. राज्यात मुंबईत कोरोना अर्थात कोविड-१९ ने पहिला बळी घेतला. लोक बेसावध राहिले. बेजबाबदार वागले, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहे. मुंबई, पुणे त्यानंतर ही लाट गावागावात पोहचली. ताळेबंदी झाली, वेशीवर गावबंदीचे फलक लागले. शाळा, मंदीर, शासकीय, खासगी कार्यालये अनेक महिने बंद होती. व्यवसाय, उद्योग बुडाले. दहा महिने कोरोनारुपी अंधःकाराशी संघर्ष करत आता आपण नवीन वर्षाचा अरुणोदय पाहणार आहोत. सर्व काही संपेल, जग बुडेल अशा काही दंत कथा आपण ऐकत आलो आहोत. हा त्याचा जणू काही एक थरारक अनुभव होता, असे चित्र वर्षभरात दिसून आले.
जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. ३१) एक लाख ५५ हजार ९१२ निगेटीव्ह अहवाल आहेत तर २१ हजार ४६७ कोरोनाबाधित रुग्ण नोंदविले गेले आहेत. २० हजार ३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृत्यू ५७३ इतकी झाली आहे. अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.
२०२० ने मृत्यूशी संघर्ष शिकवला
जगात निसर्गाकडून नेहमीच माणसाला काहीतरी शिकायला मिळत असते. आपण उगवता आणि मावळता सूर्य नेहमीच पाहतो. तो आपल्याला नेहमीच सतेजही दिसतो. परंतु तो काहीतरी आपल्याला सांगत असतो. मागील २०२० या वर्षाने आपल्याला मृत्यूशी संघर्ष शिकवला आहे.
नियमांचे पालन करावे लागणार
ता. एक जानेवारी इंग्रजी कालगणनेनुसार नव्या वर्षात प्रारंभ दिवस राहणार आहे. मागील चांगले - वाईट गोष्टींना बाजुला सारून नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत. अजून कोरोना हद्दपार झालेला नाही. हे लक्षात घेऊन आपल्याला जबाबदारीचे भान ठेवून आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
- सखाराम पांडुरंग कुकडे, सामाजिक कार्यकर्ते, अशोकनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.