नांदेड : महिला बचतगटांनी सक्रिय सहभाग घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga Campaign

नांदेड : महिला बचतगटांनी सक्रिय सहभाग घ्यावा

नांदेड - महिला या कुटुंबाचा महत्‍वाचा घटक असून महिलांच्‍या सहभागातून कोणताही कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यात येतो. त्‍यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील महिलांचा सहभाग मिळवण्‍यासाठी गाव स्‍तरावरील महिला बचतगटांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

सोमवारी (ता. एक) आभासी पद्धतीने जिल्ह्यातील सर्व स्वयंसहायता समूहातील महिलांशी त्‍यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्‍या म्‍हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या ७५ वर्षात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, हा आपल्या सर्वांसाठीच अभिमान आणि गौरवाचा क्षण आहे. अमृत महोत्सवाचा हा सोहळा संपूर्ण देशभर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याचे आपण साक्षीदार ठरणार असून बचत गटातील प्रत्येक महिलांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा तसेच गावस्तरावर जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून harghartirangananded.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. बचतगटामार्फत गाव स्तरावर तिरंगा झेंडे तयार करून विक्री करावी. यातून बचत गटांना उत्पन्न देखील मिळणार आहे. विशेषतः ता. ११ ते ता. १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच घरोघरी तिरंगा या उपक्रमात महिलांच्या हातून झेंडा फडकवला जावा, अशी अपेक्षा वर्षा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.

गृह भेटीतून जनजागृती

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात १६ हजार २९६ स्वयं सहायता समूह असून यात एक लाख ६० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये स्वयं सहाय्यता समूहाचे ७२० ग्राम संघ आणि ४१ प्रभाग संघ स्थापन करण्यात आलेले आहेत. स्वयं सहायताच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी गृह भेटीतून जनजागृती केली जात आहे.

Web Title: Har Ghar Tiranga Campaign Mahila Bachatgat Participate Nanded Varsha Thakur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedIndian FlagCampaign