सांगा, शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?

प्रमोद चौधरी
Tuesday, 22 September 2020

सद्यस्थितीत शेतकरी बाजाराच्या कात्रीत कापला जात आहे. निसर्गाने झोडपावे, बाजाराने लुबाडावे, गावच्याच मजुरांनी नाडवावे अशा विवंचनेत आज शेतकरी सापडल्याचे वास्तव ग्रामीण भागातून भगायला मिळत आहे.  

नांदेड : चार ते पाच दिवसांपासून मेघगर्जनेसह धुवॉंधार पाऊस पडत असल्याने सर्वच नद्या, नाले तुडुंब भरून वहात आहे. अनेक गावांचाही संपर्क तुटलेला आहे. शिवाय हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावल्याने आता आम्ही जगायचे कसे? असा टाहो ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला येत आहे.

नांदेडसह मुखेड, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर या पाच तालुक्यांतील नदीकाठच्या गावांत शेतीचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. यंदा मान्सुन वेळेवर आल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. परंतु, काढणीला आलेले मूग, सोयाबीनचे पीक सतत पडणाऱ्या पावसामुळे वाया गेले आहे. सोबतच ज्वारी, तूर आणि कापूस या पिकांनादेखील पावसाचा तडाखा बसल्यामुळे, शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडल्याचे वास्तव ग्रामीण भागांमध्ये बघायला मिळत आहे. 

हेही वाचा - खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसाच्या आनंदावर निलंबनाच्या कारवाईने विरजन

मुखेड तालुक्यातील शेतकरी सखाराम परमार यांनी सांगितले की, एकेकाळी शेतीला लागणाऱ्या सर्व सेवा अन्नधान्याच्या रुपात मिळायच्या. शेतीवर काम करणारा मजूर धान्याच्या रुपात मजुरी घ्यायचा. बारा बलुतेदार कामाच्या मोबदल्यात धान्य घ्यायचे. कारण पैसा असला तरी अन्नधान्याचा तुटवडा होता, म्हणूनच अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला किंमत होती. त्याचे सर्व व्यवहार अन्नधान्याच्या बदल्यात होत. हरित क्रांतीनंतर अन्नधान्याचा तुटवडा कमी होत गेला. अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतीला लागणाऱ्या सेवा पैशाच्या मोबदल्यात मिळू लागल्या. 

हे देखील वाचाच - नांदेड - कोरोना चाचणीसाठी नागरीकांची भटकंती, सोमवारी २८३ कोरोनामुक्त, १६७ पॉझिटिव्ह तर पाच जणांचा मृत्यू

परिणामी शेतकऱ्याचा कारभार पैशाविना अडू लागला. म्हणून तो कॅश देणाऱ्या पिकाच्या मागे धाऊ लागला. धावता धावता अलगद बाजाराच्या जाळ्यात अडकला. शेती निसर्गावरच अवलंबून होती आणि आजही आहे. म्हणजेच शेती रामभरोसेच आहे. पाऊस चांगला झाला तर शेती पिकणार. पावसाने दगा दिला तर शेती मुकणार, अशी अवस्था आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतीला रामभरोसे म्हणतात. श्रमावर अवलंबून असणाऱ्या शेतीला कामभरोसे शेती म्हणतात. 

येथे क्लिक कराच - जायकवाडीपासून पोचमपाडपर्यंतचे प्रकल्प भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

श्री. परमार पुढे सांगतात की, जोपर्यंत रामभरोसे व कामभरोसे शेती होती तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी असला तरी त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली नाही. निसर्गाचे तडाखे खंबीरपणे सोसत राहिला. जेव्हा शेतकऱ्यांना कॅशक्रापच्या मागे धावणे भाग पडले तेव्हा शेती भांडवलावर आधारित व्हायला लागली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतात व्हायला लागला. संकरित बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके, बीटी बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. शेती खर्चिक होत गेली. ही शेती दामभरोसे होय. हा फटकाुद्धा शेतकऱ्यांनी सहन केला. बाजार नियंत्रणात नसल्याने मार्केटने त्याला भर बाजारात उघडे पाडले. पूर्वी घरचेच बियाणे, घरचीच खते यामुळे बाजारात काही घ्यायला जावे लागत नसे.

निसर्गाने झोडपावे, बजाराने लुबाडावे
पूर्वी सर्व व्यवहार अन्नधान्याच्या मोबदल्यात होत असल्याने बाजारात धान्य विकायला जाण्याची गरज नव्हती. बाजारात होणारी लूट होत नव्हती. आज मात्र शेतकरी बाजाराच्या कात्रीत कापला जात आहे. निसर्गाने झोडपावे, बाजाराने लुबाडावे, गावच्याच मजुरांनी नाडवावे अशी अवस्था आमची झाली आहे. 
- सखाराम परमार (शेतकरी) 

किडिंचाही प्रादुर्भाव
कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळाला शेतकऱ्यांना नेहमीच समोरे जावे लागत आहे. यंदा चांगले पिक आले असतानाही सततच्या पावसाने हिरावले. हळद, केळीसारख्या पिकांवरही किडींचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
- दादासाहेब सूर्यवंशी (शेतकरी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains Cause Severe Damage To Crops In Nanded District