नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना तडाखा, पंचनामे करून मदतीची मागणी 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 26 September 2020

दरम्यान लिंबगाव परिसरात बागायती पिके वाया गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसगट सर्वच शेतातील पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी लिंबगावचे सरपंच संजय कदम यांनी नांदेड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड : जिल्ह्यात व तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्याशेतातील नुकसानीचा पंचनामा करुन तात्का?ळ शेतकऱ्यांना आर्थीक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान लिंबगाव परिसरात बागायती पिके वाया गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसगट सर्वच शेतातील पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी लिंबगावचे सरपंच संजय कदम यांनी नांदेड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड तालुक्यातील लिंबगावमध्ये सरासरी पावसाचे प्रमाण 800 ते 900 मि. मी. आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असून 1300 मि. मी. पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. त्यामुळे लिंबगावमध्ये अतिवृष्टी होऊन शेतातील सोयाबीन, कापूस, ऊस, हळद, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना सरसगट शेतीतील पिकांचे पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे अनेकजण वंचित राहत आहेत. तलाठी, कृषी कार्यालय व कृषी सहायक यांना पंचनामे करण्यास सांगितले असता ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांचेच पंचनामे करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात अखेर उपस्थिती भत्ता आणि पोषण आहाराचे वाटप -

पंचनामे करावेत व सर्वच शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी 

ठराविक लोकांच्या शेतीचे पंचनामे केल्याने इतर शेतकऱ्‍यांवर मोठा अन्याय होत आहे. संपुर्ण लिंबगाव क्षेत्रातील शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता सरसगट पंचनामे करावेत व सर्वच शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रभारी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात सरपंच संजय कदम, पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी बालाजी वाघमारे आणि उपसरपंच भीमराव पवार यांनी केली आहे.

मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये अनुदान द्या- माधव साठे

मुखेड : गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याचा फटका बहरात आलेले मुग, ऊडीद पुर्णता गेले. तसेच आता हाताशी आलेले सोयाबीन, कापुस, तुर,ज्वारी आदी पिके झालेल्या ढगफुटीमुळे, पुरांमुळे वाहुन गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सरसकट एक गांव एक पंचनामा करावे  व हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थीक मदत करावी अशी मागनी भाजपचे माधव अण्णा साठे यांनी मुखेड तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

येथे क्लिक करा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात ९१ टक्के पाणीसाठा

महापुर आल्याने जमीन खरडून गेल्या 

या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात होती. मुग व उडीद काढणी वेळी सततचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मुग, ऊडदाची रास करता आली नाही. त्यामुळे जागेवरच मोड फुटले. दरम्यान सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर या पिकावर मदार होती. ही सर्वच पिके बहरात असताना बुधवारी मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले नदी, नाल्यानां महापुर आल्याने जमीन खरडून गेल्या तर हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी थांबल्याने सर्व पिके आडवी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच अनेक गावांना पुराचा फटका बसला असुन गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले. यावेळी देविदास सुडके, नाजीम पाशा सौदागर, बसवराज चापुले, रज्जाक शेख, विलास गड्डमवार, नामदेव यलकटवार यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains hit farmers in Nanded district, seek help through servay