नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसानीचे क्षेत्र वाढले

अभय कुळकजाईकर
Thursday, 24 September 2020

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार ८३ हजार हेक्टरला बाधा झाली असल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. त्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये प्रमाण सर्वाधिक आहे.  

नांदेड - सष्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील सोळापैकी अकरा तालुक्यातील ३८१ गावांना याचा फटका बसला. यापूर्वी ३८ हजार २४२ हेक्टर नुकसानीचा अंदाज होता. त्यात वाढ होऊन आता ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. याबाबतचा अहवाल शासनाला कळविण्यात आला आहे. आता यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) च्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात सष्टेंबर महिन्यात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस होता. काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला आहे. 

हेही वाचा - नांदेड - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली, बुधवारी २४५ पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू 

मुखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण मुखेड तालुक्यात सर्वाधिक होते. यासोबत देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, धर्माबाद, नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यात पाऊस अधिक होता. या तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे नदीकाठी तसेच सखल भागातील खरिपांच्या पिकांसह केळी, ऊस अशा बागायती पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान यापूर्वीच्या पाहणीत जिल्ह्यातील ३८१ गावातील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. 

पुन्हा पावसाने झोडपल्याने नुकसान वाढले
परंतु नंतरही चार पाच दिवस पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ३८१ गावातील ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त करुन शासनाला कळविले आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी एनडीआरएफच्या हेक्टरी सहा हजार आठशे रुपये निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत ९९.४४ टक्के पावसाची नोंद
 

विविध पक्ष, संस्था, संघटनांनी केली मागणी 
जिल्ह्यातील शेतकरी संघटनांसह विविध राजकीय व सामाजीक संघटनांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, श्यामसुंदर शिंदे आदींनी शेत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. 
 
तालुकानिहाय पिकांचे झालेले नुकसान 
(नुकसान पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये) 

 • तालुका..........पेरणी क्षेत्र...........बाधीत क्षेत्र........नुकसान (टक्के) 
 • मुखेड...........७६,५२९.............१९,७६६..............५५ 
 • बिलोली.........४६,७२७.............४१,७६५..............५६ 
 • देगलूर...........५८,८१३.............१७,५०३...............४० 
 • धर्माबाद.........३०,३६०.............०२,९०७...............४० 
 • उमरी............३१,५१३..................८००...............४० 
 • नायगाव.........४६,६३३..................२१९...............३५ 
 • नांदेड............२५,४९७................९,५२४..............३३ 
 • अर्धापूर..........१९,५७३..................९७०...............४० 
 • भोकर............४५,७५९..................४८४...............५५ 
 • मुदखेड...........१९,५२७...............२,४८५...............३४ 
 • हदगाव...........७८,०५९................७,०००...............४५ 
 • एकूण............२,९०,५७५............८२,९६०..............४४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Nanded district increased the area of ​​damage, Nanded news