esakal | बहुजनांचे कैवारी : राजर्षी शाहू महाराज

बोलून बातमी शोधा

Shahu maharaj.jpg}

कोल्हापूर संस्थानातील प्रसिद्ध कर्तुत्वान पराक्रमी घाडगे घराण्यात राधामाई व आबासाहेब घाडगे यांच्या पोटी ता. २६ जून १८७४ रोजी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला. २ एप्रिल १८९४ साली त्यांचा कोल्हापूर संस्थानच्या  गादिवर प्रत्यक्ष कारभाराची सुरुवात झाली.

nanded
बहुजनांचे कैवारी : राजर्षी शाहू महाराज
sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : प्रस्थापित समाजव्यवस्थेला नाकारून अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीयवाद या समाजविघातक रूढींना नाकारून राजर्षी शाहु महाराजांनी स्वातंत्र्यपुर्व काळात समतावादी समाजव्यवस्था उभारली. विज्ञानवादी आणि पुरोगामी विचाराने राज्यकारभार करणार्याा छत्रपती शाहु महाराजांनी आधुनिक समाजव्यवस्थेची उभारणी केली. ता. २६ जुन, त्यांची जयंती. त्यानिमित्त मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी राजर्षी शाहु महाराजांचे जीवनकार्य आणि त्यांचे विचार यावर लिहीलेला हा लेख प्रसारीत करीत आहोत.

२६ जून १८७४ रोजी जन्म
कोल्हापूर संस्थानातील प्रसिद्ध कर्तुत्वान पराक्रमी घाडगे घराण्यात राधामाई व आबासाहेब घाडगे यांच्या पोटी ता. २६ जून १८७४ रोजी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला. २ एप्रिल १८९४ साली त्यांचा कोल्हापूर संस्थानच्या  गादिवर प्रत्यक्ष कारभाराची सुरुवात झाली. परकीय ब्रिटीशांची सत्ता असतांना त्यांच्या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्यांच्याच सहकार्याने आपल्या देशातील सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे हा विचार शाहू महाराजांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिक्षणाचे खऱ्या अर्थाने महत्व आणि सामर्थ्य शाहू महाराजांनी जाणले होते. म्हणूनच या देशातील अज्ञानाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात १९०२ साली प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी राजाज्ञा काढली. संपूर्ण बहुजनांच्या दारामध्ये ज्ञानगंगा आणण्याचे महान कार्य केले. परंतु त्याच राजर्षी शाहू महारांजाच्या देशात मात्र आजच्या सरकारला प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा कायदा करण्यासाठी २००९ साली उजडावे लागले ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

हेही वाचा....केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट......कुठे ते वाचा

मागासवर्गीयांना दिले आरक्षण
ग्रामीण भागातील गरिबांचे, बहुजानानंचे सर्व जाती, धर्माच्या मुलांसाठी कोल्हापूर संस्थानात वस्तीगृहाची व्यवस्था केली होती त्यांच्या याच वसतीगृहातून या देशाला अनेक शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, संशोधक, स्वातंत्र्यप्रेमी, देशभक्त मिळाले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्ष उभे करणारे कर्मवीर भाऊराव पाटील व थोर कृषीतज्ञ, कृषी अभ्यासक पी. सी. पाटील यांच्यासारखे शेकडो हिरे निर्माण झाले. मोफत आणि सक्तीचे शिक्षण असून देखील समाजाचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन समाजाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर मागासलेल्या जातींना आरक्षण दिले पाहिजे, हा पहिला विचार त्यांनी मांडला आणि १९०२ साली कोल्हापूर संस्थानात त्यांनी मागास जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली.

हेही वाचलेच पाहिजे.....आमदार, खासदारांसह अनेकजण धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

१९१६ साली डेक्कन रयत संस्थेची स्थापणा
वैदिक धर्माच्या नियमानुसार अस्पृश्यांचे होणारे हाल, परिस्थिती लक्षात घेऊन त्यांची शाळा, सार्वजनिक विहिरी, पाणवठे, दवाखाने, धर्मशाळा अशा ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे, असे आदेश त्यांनी काढले. पुढे १९१६ साली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत असोशिएशन ही संस्था स्थापण केली.

आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला
शाहू महाराजांनी अस्पृश्यता कमी करण्यासाठी १९१९ पासून सवर्ण आणि अस्पृश्य यांच्या वेगवेगळ्या शाळा बंद केल्या. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा अंमलात आणला. आपल्या संस्थानात त्यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना उद्योग, व्यवसायासाठी आर्थिक मदत करीत प्रोत्साहित केले. चोर्याा करून जगणार्या  विशिष्ट समाजातील लोकांना संस्थानामध्ये शिपाई, पहारेकरी अशा नोकऱ्या देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविले. शाहु महाराजांनी आपल्या संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला, कुस्ती या क्षेत्रातील कलावंताना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहित केले.

शेती, सिंचनाचे मोठे कार्य
शेतकऱ्यांसाठी व मजुरांच्या हाताला कामे नव्हती, शेतीतून काही उत्पन्न नसल्याने गुरांन चार्यावची आणि माणसांना अन्नपाण्याची भ्रांत पडू लागली. अशा वेळी शाहु महाराजांनी तलाव बांधणे, विहीरी खोदने अशा दुष्काळी कामांना सुरूवात केली. गरिबांसाठी स्वस्तधान्य दुकाने, निराधारांसाठी आश्रमाची स्थापणा, तगाई वाटप असे उपक्रम राबवून शेतकरी, मजूर यांचे संगोपन केले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा व त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांनी शाहु छत्रपती स्पिनिंग अॅान्ड विव्हींग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ तसेच शेती संशोधनासाठी किंग एडवर्ड अग्री कल्चरल इंस्टीट्युटची स्थापणा केली. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून त्यांनी कृषी विकास घडवून आणला.

स्त्रियांना मानाचा दर्जा मिळवून दिला
१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. हे करीत असताना त्यांनी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. त्याचबरोबर संस्थानात १०० पेक्षाही जास्त मराठा-धनगर विवाह त्यांनी घडवून आणत स्त्रियांना मानाचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या या कार्याला त्यावेळी उच्चवर्णीयांकडून प्रचंड विरोधही झाला. परंतु त्यांनी तो जुमानला नाही, आपले समाजसुधारणेचे कार्य चालूच ठेवले.

बहुजनांच्या उद्धारासाठी अहोरात्र कष्ट
त्यांनी वैदीक परंपरेतील उच्च वर्णियांची मक्तेदारी बंद करून छात्र जगदगुरू पिठाची निर्मिती केली आणि त्या पदावर बहुजन समाजातील व्यक्तीची नियुक्ती केली. धर्माच्या नावाखाली मुलं-मुली वाहण्याची पद्धती बंद करत धार्मिक सुधारणा केल्या. त्यांचे सार्वभौम कार्य पाहून कानपूर येथील कुर्मी क्षत्रीय समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली होती. वैदिक धर्मव्यवस्थेला शह देत बहुजनांच्या उद्धारासाठी व कल्याणासाठी अहोरात्र कष्ट घेणारा महान राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत
या शिवाय या देशाला संविधानाच्या रूपाने जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना बहाल करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करून परदेशात पाठवून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे महान कार्य राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी केले. एव्हढेच नाही तर परदेशातून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करून पुढे कोल्हापूर संस्थानात त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढत एका बहुजन समाजातील मुलाचा गौरव करणारा विशाल हृदयाचा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. डॉ. बाबासाहेबांची बुद्धीमत्ता पाहून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी तसेच पुढे मुकनायक वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी देखील मदत केली. तसेच मानगाव येथे झालेल्या दलितांच्या परिषदेत त्यांनी बाबासाहेब हे तमाम अस्पृश्याचे नेते असून सर्वांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारावे असे आवाहन करीत बाबासाहेबांचा सन्मान केला.

खऱ्या अर्थाने ते ‘रयतेचे राजे’ झाले
एकंदरीत बहुजनांच्या उद्धारासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विद्यार्थांच्या उज्वल भवितव्यासाठी, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या सुखासाठी, स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आणि वंचित, बहिष्कृत सामान्य रयतेच्या उत्कर्षासाठी तहयात अगदी चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या विशाल हृदयाचा महान राजाचा अल्पशा आजाराने मुंबई येथे ता. ६ मे १९२२ रोजी मृत्यूने कवटाळले. शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारे राजे होते. त्यांनी सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय समता प्रस्थापित करण्याचे काम आयुष्यभर केले म्हणून राजा या अर्थाने ते ‘रयतेचे राजे’ झाले. शाहू महाराजांच्या विचारांची अंमलबजावणी व त्यांच्या विचारांचा समाज निर्माण होईपर्यंत आपण लढाई लढूया. ता. २६ जुन त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व तमाम बहुजन बांधवांना शुभेच्छा...
जय जिजाऊ ! जय शिवराय !!

- शिवश्री कामाजी पवार
राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ.