
येथील युवकांनी गणेशला मायेचा पाझर देवून त्याला पहीले जेवू घालून त्याच्या गावाचा शोध लावला.
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) ः मध्यप्रदेशातील खंडवा, बर्हानपुर परिसरात विकासापासून कोसोदुर असलेल्या आदिवासी बांधवांची मोठी संख्या असून याच परिसरातील दहा वर्षीय गणेश मेंढ्या चारण्यासाठी आला असता मेंढपाळाच्या त्रासाने पळ काढून काही अंतर पायी तर काही अंतर एसटीच्या टपावर दरमजल करत अनेक कोस प्रवास करूण उपाशीपोटी भेदरलेल्या नजरेने हिमायतनगरच्या बस्थानकात दाखल झाला. येथील युवकांनी गणेशला मायेचा पाझर देवून त्याला पहीले जेवू घालून त्याच्या गावाचा शोध लावला. थेट चारचाकी वाहनाने मंगळवारी (ता.१८) मध्यप्रदेशातील अती दुर्गम भागात असलेल्या त्याच्या गावी सीवलला पोहचताच गणेश आईच्या कुशीत स्थिरावताच आईने हंबरडा फोडला. हे दृष्य बघून तेथे पोचवणाऱ्या हिमायतनगरच्या दोन्ही युवकांचे डोळे पाणावले.
राज्यातील बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेला लागून सातपुड्याच्या पर्वतरांगा असून पर्वत रांगेच्या पायथ्याशी मध्य प्रदेशातील बर्हानपुर, खंडवा परिसरातील डोंगरी परिसरात आदिवासी बांधवांची मोठी संख्या आहे. मात्र शिक्षणाचा अभाव, पाचवीला पुजलेली गरीबी, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे हा आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दुर फेकल्या गेला आहे. अश्यातच येथील आदिवासी बांधव भाकरीच्या शोधात आपल्या लहान बालकांना सुद्धा परराज्यात कामाला पाठवतात. या परिसरात आदिवासी मुलांना रोजगार मिळवून देणारे मोठ्या प्रमाणावर दलाल सक्रिय असून हे दलाल लोक कामाच्या बदल्यात मोठी रक्कम वसूल करून तुटपुंजी रक्कम आदिवाशांना देत असल्याने येथे सुद्धा मोठी अर्थिक पिळवणूक केली जाते.
कुटुंबीयांला केली आर्थिक मदत
अश्याच एका दलालामार्फत मध्यप्रदेश राज्यातील गणेश भुरालाल बारेला (वय दहा) हा तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी दाखल झाला. काही दिवस काम केल्या नंतर गणेशला एका गुजरात राज्यातील मेंढपाळाने त्रास देवून गणेशला भोजन सुद्धा पोटभर देत नसल्याने गणेश हा त्यांच्या तावडीतून सुटून पायी चालत इस्लापूर येथे दाखल झाला. याच वेळेत किनवटहून नांदेड जाणारी एसटी बस इस्लापूर बसस्थानकावर येताच चालक व वाहकांची नजर चुकवून थेट एसटीच्या टपावर प्रवास करून हिमायतनगर शहरात दाखल झाला. येथील युवक रोशन गोस्वामी भेळवाले व लक्ष्मीकांत होळकर उर्फ मुन्ना, यांनी त्याला जेवू घालून दोन दिवस आपल्या घरी ठेवून थेट फोरव्हीलरने शिवाल ता. नेपानघर येथे त्याच्या घरी पोहचवून या दोन्ही युवकांनी एवढ्या वरच न थांबता त्याच्या कुटुंबीयांला आर्थिक मदत देखील केली.
‘सकाळ’ने घेतला पुढाकार
मुलाला पाठविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. यात ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश जैन यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्यावतीने व स्वतः ‘सकाळ’ने आर्थिक मदत करुण सामाजिक बांधिलकी जपली. मध्यप्रदेश व आपल्या राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अनेक आदिवासी मुले भाकरीच्या शोधात देशातील विविध भागात दलाला मार्फत कामाला पाठवली जातात. मात्र यातील अनेक मुले गायब झाल्याचा धक्कादायक खुलासा येथील नागरिकांनी बोलून दाखविला.
संपादन- स्वप्नील गायकवाड