पर्यटकांचा हिरमोड, तर व्यावसायिक अडचणीत, कशामुळे? ते वाचाच 

प्रमोद चौधरी
Tuesday, 4 August 2020

श्रावणमास असूनही पर्यटन बंद असल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला आहे. तर दुसरीकडे ऐन पर्यटन हंगामात पर्यटनाचे अर्थचक्र रुतल्याने या व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 

नांदेड : मॉन्सूनपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो; मात्र कोरोनामुळे राज्यभरातील प्रेक्षणीय; तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने ही स्थळे ओस पडली आहेत. श्रावणमास असूनही पर्यटन बंद असल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला आहे. तर दुसरीकडे ऐन पर्यटन हंगामात पर्यटनाचे अर्थचक्र रुतल्याने या व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 

पहिला पाऊस पडला की निसर्गप्रेमींची पावले पर्यटनस्थळांकडे वळतात. हिरवा निसर्ग पर्यटकांना श्रावण महिन्यामध्ये खुणावू लागतो. देश-विदेशातील पर्यटनाचे बेत देखील आखले जातात; मात्र यंदा सर्वच नियोजनावर पाणी फिरले आहे. कोरोनामुळे शासनाने खबरदारी म्हणून पर्यटनस्थळांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा पर्यटनाचे बेत रद्द करून घरातच बसण्याची वेळ हौशी पर्यटकांवर आली आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक

नुकताच श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. श्रावण म्हटला की सगळीकडे आल्हाददायक वातावरणनिर्मिती झालेली असते. रंगीबेरंगी फुले-पाने-पक्षी पर्यटकांना खुणावत असतात. यात धार्मिक स्थळांवर भेटी देणाऱ्यांची मोठी गर्दी असते. ट्रॅव्हल्स, हॉटेलिंग, गाईड आदी व्यावसायिकांना या हंगामाची आतुरतेने प्रतीक्षा असते. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून दिड लाखाने गंडविले, दोघांविरुध्द गुन्हा ​

ट्रॅव्हल्सची चाके रुतली 
छोट्या ते मोठ्या ट्रीपसाठी चारचाकी गाड्यांची बुकिंग या दिवसात जोरात असते. साधारणतः एक दिवस ते आठवडापर्यंतच्या या ट्रीप्स असतात. यातून चारचाकी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली कमाई होते; परंतु सध्या सर्वच बंद असल्याने ट्रॅव्हल्स उद्योग लॉकडाउन उठण्याच्या प्रतीक्षेत आहे. 

येथे क्लिक कराच - रुग्णांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक भाव महत्वाचा- अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख

हॉटेल्सचीही दारे बंदच 
हंगामात पर्यटन व धार्मिक स्थळांवर जाऊन राहणाऱ्यांची संख्याही जास्त असते; मात्र शासनाने हॉटेल्सला अद्याप परवानगी दिलेली नसल्याने हॉटेलिंग व्यवसाय डबघाईस आलेला आहे. या व्यवसायावर अवलंबून शेफ, आचारी, बुकिंग, वेटर, हाऊसकिपिंग सर्वांवरच उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचाच - हिंगोली झेडपीचे सीईओच पॉझिटिव्ह, बुधवारपर्यंत कामकाज राहणार बंद
  
यंदा अॅडव्हेंचर टुरिझमच 
श्रावणात देशांतर्गत पर्यटन; तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे पावसाळी पर्यटनाचा हंगाम असतो. यंदा यातील काहीच शक्य झाले नाही. परिस्थिती पाहता अंदाजे दीड वर्ष तरी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. या श्रावणात पर्यटकांना टुरिझमचाही उपवास पडणार आहे. एका टुरिझम कंपनीकडून वर्षभरात किमान ५०० पर्यटक बाहेर जातात. यातून मिळणारे उत्पन्न यंदा शून्यावर आले असल्याची प्रतिक्रिया नांदेड शहरातील व्यावसायिकांनी दिली. 
 

ही आहेत नांदेड जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटनस्थळे 
तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब नांदेडचे मुख्य गुरुद्वारा, श्रीक्षेत्र माहूरगड, माहूर किल्ला, माहूरची पांडव लेणी, कंधारचा किल्ला, शांतीघाटावरील शिल्पवैभव, कंधारचा दर्गाह, महाविहार बावरीनगर, होट्टल, सहस्रकुंड धबधबा, निसर्गरम्य काळेश्वर, श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, शिऊरच्या लेणी, नांदेडचा नंदगिरी किल्ला, बिलोलीची मशीद, उनकेश्वर, मुखेडची ऐतिहासिक बारव, शंखतीर्थ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hiramod Of Tourists But In Commercial Difficulty Nanded News