बियाणींच्या हत्येची गृहमंत्र्यांनी घेतली दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister ashok chavan takes notice of killing of Sanjay Biyani nanded
बियाणींच्या हत्येची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

बियाणींच्या हत्येची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

नांदेड : येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्या प्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरूवारी (ता. सात) दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पालकमंत्री चव्हाण यांची गुरुवारी दुपारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम तसेच बियाणी कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला. संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी या प्रसंगी केली व गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, संजय बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण व या हत्येचा हेतू काय? याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे.

तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

नांदेड : बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी (ता. पाच) दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले.

खासदार चिखलीकर यांनी माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून दिले. निवेदनात म्हटले की, नांदेड शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक उत्तम बांधकाम उद्योजक माहेश्‍वरी समाजातील तरुण समाजसेवक यासोबतच समाजशील व्यक्तिमत्व म्हणून संजय बियाणी यांची ख्याती होती. अल्पावधीत त्यांनी बांधकाम क्षेत्रात घेतलेली भरारी अतुलनीय होती. सामाजिक क्षेत्रातले त्यांचे काम तितकेच मोठे होते. माहेश्‍वरी समाजातील गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवत अल्पदरामध्ये घरे दिली. त्यामुळे बियाणी यांचे सामाजिक आणि बांधकाम या क्षेत्रातील योगदान अतुलनीय होते.

मात्र ता. पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी बियाणी यांच्या घरासमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येला दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी नांदेड पोलिसांना अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. नांदेड पोलिसांकडून योग्य दिशेने तपास होत नसल्याचेही चर्चिले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा खासदार चिखलीकर यांनी तातडीने दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व या हत्याकांडाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत करावा, बियाणी कुटुंबीयांना न्याय द्यावा, मारेकऱ्यांना आणि त्याच्या सूत्रधारास तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.

Web Title: Home Minister Ashok Chavan Takes Notice Of Killing Of Sanjay Biyani Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..