वेळेचा सदुपयोग करत जोपासला छंद

अभिजीत महाजन
Friday, 16 October 2020


कोविड-१९ मुळे मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण देशातले जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरवातीला तीन महिने टाळेबंदीमुळे सर्वांना घरीच रहावे लागले. यादरम्यान अनेकांनी या वेळेचे योग्य नियोजन करून सदुपयोग करून घेतला, कुणी संगीत, योगा, वाचन व लिखाण तर कुणी आपल्या आवडीचे इतर छंद जोपासले. सगरोळी (ता.बिलोली) येथील नंदकुमार ओतारी या कला शिक्षकानेही या संधीचा फायदा घेत, वेळेचा सदुपयोग करून आपल्या कुंचल्यातून अनेक चित्रांची निर्मिती करीत आपल्यातील कला वृद्धिंगत केली.
 

सगरोळी, (ता. बिलोली, जि. नांदेड) ः  कोविड-१९ मुळे मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण देशातले जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरवातीला तीन महिने टाळेबंदीमुळे सर्वांना घरीच रहावे लागले. यादरम्यान अनेकांनी या वेळेचे योग्य नियोजन करून सदुपयोग करून घेतला, कुणी संगीत, योगा, वाचन व लिखाण तर कुणी आपल्या आवडीचे इतर छंद जोपासले. सगरोळी (ता.बिलोली) येथील नंदकुमार ओतारी या कला शिक्षकानेही या संधीचा फायदा घेत, वेळेचा सदुपयोग करून आपल्या कुंचल्यातून अनेक चित्रांची निर्मिती करीत आपल्यातील कला वृद्धिंगत केली.

 
(ता.२२) मार्च रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनानंतर शिक्षकांना सुट्ट्या असतात, परंतु दीड महिना अगोदरच सुट्ट्या सुरू झाल्या. शिकवणी, परीक्षा काहीच नसल्याने आता करावे काय? असा प्रश्न येथील शिवाजी हायस्कूलचे कला शिक्षक नंदकुमार ओतारी यांना पडला. वेळेचा सदुपयोग व आपल्यातील कला अधिक समृद्ध कशी होईल असा विचार केला व कोरोना या महामारीवार जनजागृती करण्यासाठी रांगोळी काढून कामास सुरवात केली. 

 

हेही वाचा -  खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर, रुग्णसंख्या घटल्याचा परिणाम; शुक्रवारी १०५ पॉझिटिव्ह -

 

यानंतर प्रसंगानुरूप रामनवमी, गुढीपाडवा, होळी, अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमीपूजन, गोकुळाष्टमी अशा अनेक रांगोळ्या काढल्या. घरातील अडगळीत पडलेले  दगड मातीची भांडी या साहित्यातून व जून्या रद्दीतून फ्लॉवरपॉट, पेनस्टँड अशा अनेक वस्तूंची निर्मीती केली. वारली कला अभ्यासून अनेक वारली चित्रे रेखाटली. मांजरा नदी, बालाघाट डोंगर अशी नैसर्गिक चित्रे, आपल्या शाळेच्या परिसरातील अनेक दृश्य रेखाटले तर विशेष व्यक्तींचे चित्रेही त्यांच्या कुंचल्यातून अवतरली. 

‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेचा मोलाचा वाटा
दरवर्षी ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रशालेतील हजारो विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात प्रशाला अग्रेसर असते. या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने दरवर्षी सहभागी होतात. अशा उपक्रमांमुळे प्रशालेत चित्रकला या विषयात रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. असे कुंडलीक लकडे, कला शिक्षक, शिवाजी हायस्कूल यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hopes For Making Good Use Of Time, Nanded News