किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 28 January 2021

बावरीनगर इथं ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात

नांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पुजला ? आणि किती प्रचार- प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार- विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.

तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे गुरुवारी ( ता. २८ ) जानेवारी रोजी ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली. भदन्त इन्दवन्श महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते सकाळी धम्मपरिषद परिसरामध्ये पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसना देताना भदंत इन्दवन्श महाथेरो बोलत होते.

मुळावा येथील भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचामालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला

याप्रसंगी पुढे बोलतांना भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी तथागत भगवान बुद्धाने मानव कल्याणासाठी हा बुद्धधम्म दिला, असे सांगितले. पंचशील तत्वे, आर्यअष्टांगिक मार्ग अनुसरणामुळे जीवनातून दुःखाचा -हास होण्यास मोठी मदत मिळते. त्याचबरोबर शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.

दोन दिवस चालणाऱ्या धर्मपरिषदेत पहिल्यांदाच 'ऑनलाइन' दूर दृश्य प्रणालीचा वापर करण्यात आला. परिषदस्थळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे पालन करुन उपस्थित जनसमुदाय विद्वान भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घेतील, यासाठी आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे.

आज पहिल्या दिवशी सकाळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण अआदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री भव्य एल. ई. डी. स्क्रीनवर उपस्थित उपासकांना इटली, फ्रान्स, आयर्लंड, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदी देशातील पूज्य भिक्खू संघ ऑनलाईन धम्मदेसना देणार आहे. धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ता. २९ जानेवारी रोजी दिवसभर भगवान बुद्धांच्या उपदेशावर भिक्खू संघाकडून धम्मदेसना दिली जाणार आहे. शुक्रवारी रात्री या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप होईल, असे महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी स्पष्ट केले. धम्म परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भिख्खुसंघ उपस्थित झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much Buddha's 'Dhamma' was practiced is more important than how much he read and how much he worshiped Bhadant Indavansh Mahathero nanded news