नांदेडला शंभरी पार : आज दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह, संख्या गेली १०६ वर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

रात्री १०.३० वाजता १६१ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

नांदेड :  सोमवारपर्यंत प्रलंबित असलेल्या १८२ संशयित अहवालापैकी मंगळवारी (ता. १८) सकाळी २४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २३ अहवाल निगेटिव्ह तर करबलानगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रात्री १०.३० वाजता १६१ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

नांदेडला दररोज धक्क्यावर धक्के बसत असून मंगळवारी दिवसभरात नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १०६ वर गेली आहे.  सकाळी सापडलेला रुग्ण हा अबचलनगरातील रुग्णाच्या संपर्कातील होता. तर रात्री १०.३० वाजता आलेल्या अहवालातील सहा रुग्ण हे कुंभार टेकडी येथील रुग्णाच्या संपर्कातील तर दोन रुग्ण हे करबला नगरातील मयत रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली आहे. 

हेही वाचाच - गुलाबांची फुले झाली मातीमोल

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नांदेडकरांसाठी चांगले गेले. मात्र काही जणांचा स्वॅब अहवाल येणे बाकी होते. त्यामुळे नांदेडकरांची चिंता कायम होती. सोमवारी (ता. १८) सायंकाळी पाचपर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एक लाख १९ हजार ६११ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन हजार ७०२ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. दोन हजार ४२० स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर एकुण १८२ चा अहवाल प्रलंबित होता. या १८२ प्रलंबित अहवालापैकी मंगळवारी सकाळी २४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २३ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रात्री १०.३० वाजताच्या १६१ अहवालामध्ये ८ जणांचा अहवाल पझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बधित रुग्णांपैकी ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत कोरोना बाधित रुग्णांवर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,  पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु असल्याचेही डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds Crossed Nanded: Nine Positives Today Nanded News