पतीची क्रुरता : पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

प्रल्हाद कांबळे
Monday, 31 August 2020

एवढेच नाही तर पोलिसात तक्रार दिली म्हणून तिच्या माहेरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नांदेड : पैशाची मागणी करुन माहेराहून पैसे आणले नसल्याने एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला घरातून हाकलून दिले. एवढेच नाही तर पोलिसात तक्रार दिली म्हणून तिच्या माहेरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. २९ आॅगस्ट रोजी अंबुलगा (ता. मुखेड) येथे घडली. भाजलेली पिडीत विवाहिता ही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

पैशाच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षात तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात ती गंभीर भाजली असून तिच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात पतीसह पाच जणांविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यकला संतोष पुपलवाड असे पीडीत विवाहितेचे नाव आहे.

हेही वाचाकिनवटजवळ झालेल्या दुचाकींच्या अपघातात चार ठार

तु दिसायला चांगली नाहीस 

या विवाहितेला सासरच्या मंडळींनी लग्नानंतर काही दिवसांनी तु दिसायला चांगली नाहीस असे म्हणून माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये तसेच आंबुलगा (ता. मुखेड) येथील दोन एकर जमीन नावाने करून दे तरच तुला नांदवेल नसता नाही अशी धमकी दिली. यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून वेळप्रसंगी मारहाण करण्यात येत होती. सत्य कला यांना लग्नात मिळालेले सर्व दागिने पतीने काढून घेतले. त्यानंतर तिला घरातून हाकलुन दिले. 

तक्रार दिल्याने सासरच्या मंडळीचे पित्त खवळले

होणारा त्रास कमी व्हावा व संसार सुरळीत चालावा यासाठी सत्यकला (वय २०) हीने पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षात धाव घेतली. या ठिकाणी तक्रार केली म्हणून सासरच्या मंडळींचा आणखी तीळपापड झाला. ता. २९ ऑगस्ट रोजी आरोपी पती हा अंबुलगा (ता. मुखेड) माहेरी असलेल्या सत्यकला हिच्याकडे गेला. माझ्या विरोधात तक्रार का केली म्हणून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने पती संतोष पपुलवाड याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. सत्यकला यांनी गंभीर भाजलेल्या अवस्थेत हाताला झटका देऊन पळ काढला. म्हणून यात ती बचावली. मात्र पेट्रोल अंगावर पडल्याने सत्यकला ही चांगलीच भाजली. तिला तात्काळ नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. 

येथे क्लिक करानांदेडचे जिल्हाधिकारी थेट मुगाच्या खळ्यावर, कशासाटी? ते वाचाच

यांच्यावर मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा 

तिच्या तक्रारीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात संतोष माधव पपुलवाड (वय २४), पार्वतीबाई पपुलवाड, माधव पपुलवाड, अंकुश पपुलवाड आणि लक्ष्मण पपुलवाड सर्व राहणार निवळी (ता. मुखेड) यांच्याविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न, विवाहितेचा छळ या आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband's cruelty: Attempt to burn his wife by throwing petrol on her body nanded news