पत्नीची प्रसुती शासकीय रुग्णालयात करणारे आदर्श जिल्हाधिकारी

अभय कुळकजाईकर
Tuesday, 18 August 2020

गेल्या सहा महिन्यापूर्वी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन रुजू झाले. त्यांनी नेहमीच त्यांच्या कार्याची पावती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नांदेडकरांना दिली आहे. साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या डॉ. विपीन यांचे काम अनेकांनी पाहिले असून ते कोणताही निर्णय तत्काळ घेतात. त्यामुळे अनेक सर्वसामान्यांची कामे मार्गी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

नांदेड - शासकीय दवाखाना म्हटले की आजही अनेकजण नाक मुरडतात आणि खासगी दवाखान्याला प्राधान्य देतात, ही वस्तुस्थिती आहे. पण शासकीय दवाखाने देखील चांगले असतात आणि त्या ठिकाणी सुद्धा उत्तम सेवा रुग्णांना मिळते, याचा वस्तुपाठ नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेडकरांसमोर घालून दिला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे ‘आधी केले, मग सांगितले’ असा असून त्यांचा हा आदर्श इतरांना देखील अनुकरणीय आहे. 

गेल्या सहा महिन्यापूर्वी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन रुजू झाले. त्यांनी नेहमीच त्यांच्या कार्याची पावती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नांदेडकरांना दिली आहे. साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या डॉ. विपीन यांचे काम अनेकांनी पाहिले असून ते कोणताही निर्णय तत्काळ घेतात. त्यामुळे अनेक सर्वसामान्यांची कामे मार्गी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. लोकप्रतिनिधींपासून ते प्रसारमाध्यमे, सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा नेहमीच केली आहे. 

हेही वाचा - नांदेडला शनिवारी दुकाने सुरु ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 

जिल्हाधिकारी यांच्या पत्नीही डॉक्टर
जिल्हाधिकारी असले तरी त्यांनाही कुटुंब असते. इतरांसारखे त्यांनाही सुख दुखःतून जावे लागते. जिल्हाधिकारी हे डॉक्टर असून त्यांची पत्नी सौ. शालिनी या देखील डॉक्टर आहेत. तसेच त्यांना आयान नावाचा मुलगाही आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात कुटुंबवत्सल असलेल्या डॉ. विपीन यांनी त्यांचा मुलगा आयान याची घरीच स्वतः कटिंग केली होती आणि त्यातून लॉकडाउनचे नियम पाळा, असा संदेशही दिला होता. कोरोना संसर्गाच्या काळातही त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यात त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. अशा काळात उपचार आणि प्रसुती म्हणजे मोठी जबाबदारी होती. डॉ. विपीन यांनी घरची आणि बाहेरचीही जबाबदारी समर्थपणे पेलली. 

शासकीय रुग्णालयात प्रसुतीचा निर्णय 
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या पत्नी डॉ. शालिनी यांना श्यामनगरच्या शासकीय प्रसुती रुग्णालयात दाखल केले. खरे तर जिल्हाधिकारी म्हटल्यानंतर ते शहरातील कोणत्याही चांगल्या खासगी रुग्णालयात दाखल करु शकले असते. मात्र, कुठलाही बडेजाव न करता त्यांनी शासकीय रुग्णालयात प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर दांपत्य असल्यामुळे दोघांनीही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीही झाली. शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्या ठिकाणीही चांगल्या सुविधा मिळतात, याचा जणू प्रत्यय त्यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि डॉ. शालिनी यांना श्रावणी सोमवारी (ता. १७) कन्यारत्न प्राप्त झाले. 

हेही वाचलेच पाहिजे - पोळा सणासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या काय आहेत सुचना?...वाचा

शासकीय रुग्णालयाचाही वाढला नावलौकिक  
शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्याची माहिती कळाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक आणि अभिनंदन केले. शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधांचा अभाव असतो, अशी ओरड नेहमी होत असते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या टिकेला छेद देण्याचे काम केले आणि आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे शासकीय रुग्णालयातही चांगल्या सुविधा मिळतात, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे श्यामनगरच्या शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यामुळे रुग्णालयाचाही नावलौकिक वाढला आहे. नांदेडकरांनी देखील शासकीय रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीमधून दिला आहे. 

अनेकांनी केले कौतुक, अभिनंदन
जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचबरोबर इतर कार्यालयातील अधिकारी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी यांनी देखील ही घटना माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे प्रत्यक्ष भेटून तर काहींनी मोबाईलवरुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. पेढे, जिलेबीही वाटली. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी देखील आनंद व्यक्त करत शुभेच्छाचा स्विकार केला आहे.      

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ideal collector who gives birth to his wife in a government hospital, Nanded news