नांदेडकरांनो गर्दी केली तर समुह संसर्गाचा धोका वाढणार!

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 30 जून 2020

कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या नांदेडकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. विनाकारण रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी केली तर समुह संसर्गाचा धोका वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

 नांदेड - शहरासह जिल्ह्यातील काही भागात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर तसेच बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता अशीच रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी राहिली तर समुह संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे नांदेडकरांनी काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. 

कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या नांदेडकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. विनाकारण रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी केली तर समुह संसर्गाचा धोका वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर तसेच बाजारपेठेत गर्दी करु नये तसेच सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा - हात कपाळावर अन् डोळे आभाळाकडे

प्रशासनाच्या सूचना पाळणे अत्यावश्‍यक
नांदेड जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. ३० जून) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पावणेचारशेच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाढती संख्या लक्षात घेता गर्दी करणे टाळावे लागणार आहे तसेच आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केले असून त्यांच्या सूचना पाळणे अत्यावश्‍यक आहे. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही बऱ्याच ठिकाणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

दीड लाख लोकांचे सर्व्हेक्षण
नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख ४६ हजार ६८१ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर जवळपास साडेसहा हजार स्वॅब घेण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ३७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनापासून बचाव करा
कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन आवश्‍यक आहे. अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर जाताना तोंडाला मास्क लावावे, सॅनीटायझरचा वापर करावा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळले पाहिजे.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना अपडेट - नांदेडला एकाचा मृत्यू, तर सहा पॉझिटिव्ह

आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावा. जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Nandedkars crowd, the risk of group infection will increase!, Nanded news