नांदेड जिल्ह्यात विवाहिता छळाच्या घटनांमध्ये होतेय वाढ

प्रमोद चौधरी
Sunday, 11 October 2020

लाॅकडाऊनच्या परिणामामुळे अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. परिणामी दुकान टाकण्यासाठी, गाडी, प्लाॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे म्हणून विवाहित छळांच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात वाढ होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 

नांदेड : पैशाच्या कारणावरून विवाहिता छळाच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अलिकडे वाढ होताना दिसत आहे. दररोज जिल्ह्यामध्ये माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून दोन ते पाच विवाहिता छळाच्या घटना घडत आहेत. 

रविवारी जिल्ह्यात चार विवाहिता छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये  उंद्री (ता.मुखेड) येथे ३२ वर्षिय विवाहितेचा दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ७० हजार रुपये आणण्यासाठी शारिरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सदर विवाहितेने देगलुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वसंतनगर (नांदेड) येथील ३० वर्षिय विवाहितेचा माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून सातत्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याने सदर विवाहितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

तिसरी घटना म्हाडा काॅलनी नवीन कौठा येथे २५ वर्षीय विवाहितेच्या बाबतीत घडली. सदर महिलेलाही सासरकडील मंडळिंनी मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये घेवून ये म्हणून सतत मारहाण केली जात होती. या त्रासाला कंटाळून सदर विवाहितेने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे देखील वाचाच - नांदेड बाजार समितीत हळदीचा ऑनलाइन लिलाव सुरु ​

पैशासाठी विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात
विश्वतेज रेसिडेन्सी छत्रपती चौक नांदेड येथे २८ वर्षिय विवाहितेचा पैशासाठी नेहमीच छळ केला जात आहे. शिवाय गर्भवती असताना पतीने डाॅक्टरांकडे नेवून गर्भपात करण्यास भाग पाडल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. त्यात म्हटले की, माझ्या वडिलांनी लग्नात वरदक्षिणा म्हणून २१ लाख रुपये व २१ तोळे सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसाठी एक लाख रुपये दिले होते. एवढे देवूनही प्लाॅट घेण्यासाठीही पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केला जात होता. त्याला कंटाळून माझ्या आई-वडिलांनी पाच लाख रुपयेही आणून दिले. 

येथे क्लिक कराच - सार्वजनिक ग्रंथालय चालकांच्या अडचणीत वाढ

मात्र, सासरकडील मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीतर,  प्लाॅट घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करून मला मारहाण व शिवीगाळ करून छळ करत आहेत. विशेष म्हणजे मी गर्भवती असताना पतीने मला हे बाळ नको म्हणून मारहाण केली. त्यामुळे गर्भस्त्राव झाला. पोटातील बाळाची तपासणी करायची म्हणून मला डाॅक्टरांकडे नेले. तेथे माझ्याविरुद्ध खोटे कारण सांगून गर्भपात केल्याचे २८ वर्षिय विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. नरवाडे पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incidents Of Marital Harassment Are On The Rise In Nanded District