मूलभूत प्रश्नांना भिडण्याऐवजी हे चाललंय तरी काय? कोण म्हणाले ते वाचा ?

file photo
file photo

नांदेड : भारताचा गेल्या तीन महिन्यांचा आर्थिक विकास दर उणे 23.90 इतका खाली घसरलेला आहे. लाखो लोक बेरोजगार झालेले आहेत. असंख्य जणांचं जगणंच मुश्कील झालेलं आहे. कोरोना आजाराने रोज हजारो लोक मरत आहेत. दररोज 75 ते 80 हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.सरकारी दवाखान्यांमध्ये गोरगरीब रूग्णांचे हाल होत आहेत. खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत. शाळा कॉलेज बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी गोरगरीब,दलित, आदिवासी मुलांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे त्यांची शिक्षण प्रक्रिया बंद पडलेली आहे. श्रीमंतांची मुले शिकतात परंतु गरिबांची मुले शिकू शकत नाहीत. 

चीन भारतात घुसखोरी करतो आहे. चीन आणि भारताचे रणगाडे आमने सामने आलेले आहेत. युद्धाला कधी तोंड फुटेल सांगता येत नाही. अशा अनेक गंभीर प्रश्नांच्या जंजाळात देश अडकलेला आहे.हे सारे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. ते प्रश्न कसे सोडवले पाहिजेत.यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. या जळजळत्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून बरेच लोक मंदिरे उघडण्याची घाई करत आहेत. हे विवेकाला धरून दिसत नाही.

समाजात पुढारपण करणाऱ्या लोकांना का समजेनासं झालंय?

आणखी काही दिवस देशातील मंदिरे, मस्जिदी,चर्च, गुरुद्वारा, विहार बंद राहिले तर काहीही बिघडणार नाही. लोक आपापली श्रद्धा आपापल्या घरी राहूनही व्यक्त करू शकतात.आपल्या देशातल्या गावागावांमध्ये आणि गल्लीगल्लीमध्येही मंदिरांची, विविध प्रार्थना स्थळांची कुठलीही कमतरता नाहीये.आजच्या संकट काळात घरी राहून आपली श्रद्धा व्यक्त करणेच मानवी हिताचे आहे. हे समाजात पुढारपण करणाऱ्या लोकांना का समजेनासं झालंय?शाळा कॉलेजमधील शिक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने का होईना कशी प्रभावी करता येईल यासाठी आपली शक्ती का पणाला लावली जात नाही? बेकार झालेल्या लाखो लोकांच्या जगण्याचं काय करायचं? या प्रश्नाला हे लोक का भिडत नाहीत? करोनाग्रस्तांचे हाल होत आहेत.

देवधर्माचं राजकारण करण्याची ही वेळ मुळीच नाही.

प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य सुविधा मिळतील यासाठीचे प्रयत्न जीव तोडून केले पाहिजेत, असे का वाटत नाही?विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी म्हणून साथरोमध्ये रुग्णसंख्या वरचेवर मोठ्या प्रमाणात वाढत असूनही लॉक डाऊन शिथील केलं म्हणून कशीही मनमानी करावी काय? देवधर्माचं राजकारण करण्याची ही वेळ मुळीच नाही. मंदिरं उघडली की सारे प्रश्न सुटणार आहेत काय? साऱ्याच राजकीय पक्षांना माझं कळकळीचं आवाहन आहे की भयंकर असे जळजळते प्रश्न लोकांना हैराण करत आहेत. कृपया त्या वास्तव प्रश्नांना भिडून ते प्रश्न सोडवणारं राजकारण करा.

शब्दांकन- प्रा. अनंत राऊत, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com