नांदेड परिमंडळांतर्गत वीज ग्राहकांशी संवाद मेळावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

वीज देयकाची शंका निरसन करण्यासाठी महावितरणचे प्रादेशीक कार्यालय (औरंगाबाद) चे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या सुचनेनुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी ग्राहक संवाद मेळावे आयोजित केले आहेत

नांदेड :  लॉकडाउनच्या कालावधीत वीज ग्राहकांना माहे एप्रिल, मे व जुन या तीन महिन्यांच्या एकत्रित आलेल्या वीज देयकाची शंका निरसन करण्यासाठी महावितरणचे प्रादेशीक कार्यालय (औरंगाबाद) चे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या सुचनेनुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी ग्राहक संवाद मेळावे आयोजित केले आहेत.

वीज देयकाबाबत असलेल्या तक्रार निवारणासाठी नांदेड मंडळात १०४ ठिकाणी, परभणी मंडळात ४३ ठिकाणी तर हिंगोली मंडळात २६ ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेले आहेत. ग्राहकांचे निरसन करण्यासाठी शहरात, तालुक्याच्या ठिकाणी उपविभागात तर गावामध्ये आठवडी बाजारात मेळावे आयोजित केलेले आहेत. त्याठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करुन समजावून सांगत आहेत.

हेही वाचामुखेडमध्ये घरात घुसून मारहाण केली आणि महिलेच्या....
 
संवाद साधण्याचे नियोजन

तसेच उपविभागीय स्तरावर लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरीक व पत्रकार यांचा एक Whatsapp Group तयार करण्यात आलेला आहे, काही वीज ग्राहकांची तक्रार असल्यास Whatsapp Group व्दारे संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी तीनही जिल्ह्यातील वीज ग्राहकांशी वेबिनार व मेळाव्याव्दारे आलेले वीज देयक हे बरोबर असल्याचे संवादाव्दारे योग्य प्रकारे समजावून सांगत आहेत. 

तालुकानिहाय व उपविभागनिहाय वेबिनार घेण्याचे नियोजन

तसेच सर्व तालुकानिहाय व उपविभागनिहाय वेबिनार घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी वीज ग्राहकांनी आपली वीजदेयकाबाबतची तक्रार असल्यास सदरील वेबिनारमध्ये भाग घ्यावा व शासनाने कोवीड- १९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुरक्षा व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महावितरणकडुन करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interact with power consumers under Nanded Circle