esakal | जागतिक महिला दिनी नववधूला मिळाली सिंदखेड पोलिसांकडून प्रेमाची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महिलांचे स्वातंत्र्य अबाधित राखत सिंदखेड पोलीस ठाण्यात पार पडले आंतरजातीय विवाह...

जागतिक महिला दिनी नववधूला मिळाली सिंदखेड पोलिसांकडून प्रेमाची भेट

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : पोलिस ठाणे म्हटलं की, चोरी, हत्या, फसवणूक, मारहाण, गुन्हेगार इत्यादी सर्व डोळ्यासमोर येते. मात्र, याच पोलिस ठाण्यात कधी- कधी काही चांगल्या गोष्टीही घडत असतात. माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीच्या अनुषंगाने मनिरामखेड येथील स्नेहा आदिनाथ सोनडवले आणि दहेली तांडा येथील अजय बाबू राठोड यांच्यात प्रेम संबंध जुळले होते. घरच्यांचा विरोध पत्करुन दोघेही रविवारी (ता. सात) रोजी घरुन निघून गेले होते. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या समन्वयाने दोघांच्याही घरच्या मंडळीची समजूत घालून सोमवारी  (ता. आठ) रोजी जागतिक महिला दिनी पोलिस ठाण्यातच या प्रेमी जोडप्याचं आंतरजातीय विवाह पार पाडण्यात आला. 

माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिस ठाण्यात  (ता. आठ) सोमवारला एक आगळावेगळा लग्न सोहळा पार पडला. माहूर तालुक्यातील मनीरामखेड येथील स्नेहा सोनडवले आणि किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील अजय राठोड यांनी पोलिस ठाण्यात एकमेकांच्या गळ्यात हार घालून जन्माचे सोबती झाले. स्नेहा आणि अजय हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र घरच्यांना सांगूनही मुलगा इतर जातीचा असल्याने अपेक्षेप्रमाणे घरच्यांनी विरोध केला. कायदेशीर वयाची अट पूर्ण केलेल्या अजय आणि स्नेहाने व्यथित होऊन घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला.व तसेच झाले (ता. सात) स्नेहा अजयसोबत निघून गेली. 

हेही वाचा - हिंगोलीत सात दिवसानंतर उघडलेल्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने स्नेहाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. पोलिसांनी या दोघांचाही शोध अवघ्या काही वेळातच लावला आणि त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. स्नेहा आणि अजय यांची प्रेम कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावलं वर पक्षाकडून दहेली तांडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नाईक, वधू पक्षाकडून तरुण सामाजिक कार्यकर्ते त्रिशुल माणिकराव पाटील यांना सोबत घेऊन कुटुंबियांची पोलिसांनी समजूत घातली. दोघांच्या पालकांना लग्नासाठी तयार केलं. अखेर दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिला. मग काय पोलीस कामाला लागले हार फुलं आले,आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत स्त्रीत्वाचा आदर करत, महिलांचे स्वातंत्र्य अबाधित राखत पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने थेट पोलिस ठाण्यात प्रेमी जोडप्याने एकमेकांना हार घालून लग्नही पार पडले.

एकंदरीत सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनी एक आंतरजातीय विवाह पोलिस स्टेशन सिंदखेड येथे पार पाडत समाजात एक वेगळा आदर्श घडवून दिला. जागतिक महिला दिनी नववधूला तिच्या प्रेमाची भेट मिळाल्याची चर्चा सर्वदूर पसरली होती. लग्न लावून दिल्याबद्दल स्नेहा आणि अजयने पोलिसांचे धन्यवाद मानले.

पोलीस ठाण्यात नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतात आणि पोलिस नेहमी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक आणखी यशस्वी प्रयत्न पार पडला. समाजाप्रती विशेषतः महिलांप्रती आमचे जे नैतिक कर्तव्य होते ते आम्ही या अंतरजातीय लग्नाच्या निमित्ताने पार पडले.

- भालचंद्र तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

संपादन- प्रल्हाद कांबळे