esakal | आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे- डॉ. हनुमंत भोपाळे

बोलून बातमी शोधा

प्रा. हनुमंत भोपाळे
आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे- डॉ. हनुमंत भोपाळे
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शस्त्र आपल्या शरीराचे संरक्षण करु शकतील पण मनाचं संरक्षण करु शकत नाहीत. शस्त्राने आत्मबल देतील असे सांगता येत नाही. सकारात्मक विचार, संयम, सहनशीलता, सकारात्मक भावनाच मनाला उभारी आणि आत्मबळ (Self difence)देतात. या बळाला विसरुन जगणारी माणसं तळमळत जगतात. नको त्याचा आधार घेतात. दारुचे सेवन हा काही आत्मबळ वाढवणारा मार्ग नव्हे! असं करणं म्हणजे घराला लागलेली आग विझविण्यासाठी पेट्रोल (House Fire) टाकण्याचा प्रकार ठरतो. (It is very important to try to increase self-confidence. Hanumant Bhopale)

दुखणं हाल्याला अन् इंजेक्शन पखालीला असाही प्रकार ठरतो. आत्मबल गरजेचे असेल तर त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असते. विधायक उक्ती, कृती, सत्संग, सकारात्मक विचार भावना आणि कल्पना बरोबर योगसाधना, सकारात्मक स्वयंसूचना याबाबी आत्मबल वाढण्यासाठी उपकारक ठरतात. आत्मबळ प्रतिकूल परिस्थितीत उपकारक ठरते. सध्याच्या कोरोना काळात (Covid-19)तर याची नितांत गरज वाटत आहे. एकटेपणा पोखरून टाकत असेल तर आत्मबल वाढवा.

हेही वाचा - धमकी देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!

कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागेल म्हणून काहीजण भयभीत होऊन टेस्ट करण्यासाठी समोर येत नाहीत. दवाखान्यात एकट असण्याची आपणास सवय नव्हती. कुणी तरी नातेवाईक सोबत, भेटायला येणारी माणसं यामुळे आपले आत्मबल वाढून रुग्ण लवकर बरा होत होता. आक्सिजन लावावा लागेल, व्हेंटिलेटर जावे लागेल याची स्वप्नातही कल्पना न केलेल्या माणसाला जेव्हा प्रत्यक्ष याचा अनुभव घ्यायची वेळ येत आहे तेव्हा ते भयभीत होत आहेत. आॅक्सीजन लावताना काही जण हातपाय गाळून बसत आहेत. अशा वेळी ज्यांचे आत्मबल चांगले आहे, ते माणसं या सर्व परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करीत आहेत. आत्मविश्वाने वाटचाल करणारी असंख्य माणसं आहेत या जगात. मला काही होत नाही,या परिस्थितीवर सहज मात करतो हा विचार सतत केला तर आत्मबल वाढण्यासाठी उपकारक ठरते. आपल्याला शूरवीरांचा वैभवशाली इतिहास आहे,त्यांचं स्मरण करणे आत्मबल वर्धक ठरते.

एका तमाशा मंडळातील उत्कृष्ट नृत्यांगना गरोदर असते,नऊ महिने पूर्ण झालेले असतात.त्यामुळे ती नृत्य करण्यासाठी स्टेजवर येतं नाही.रसिक,तिची मागणी करत गोंधळ घालतात.पडदेही फाडायला सुरूवात करतात.अशा परिस्थितीत हळूहळू प्रसुती कळा सुरू झालेल्या अवस्थेत ती नृत्यांगना नटूनथटून नृत्य सादर करण्यासाठी स्टेजवर येते.नृत्य करते.मग ती पाठीमागे जाऊन बाळांना जन्म देते.याची जाणीव नसलेले रसिक परत गोंधळ घालतात. तेव्हा ती परत स्टेजवर येते आणि म्हणते," रसिक मायबाप हो,मी आताच बाळाला जन्म दिला आहे" .तेव्हा रसिक शांत होतात.आश्चर्यचकित होतात.

कठिण परिस्थितीत आपलं कर्तव्य सोडायचं नसते डोळ्यांतल्या अश्रूंनी जगणं सजवायचं असते. उजेड पेरुनच अंधार दूर होते असाच बोध त्या नृत्यांगनेने दिला.असाच बोध अनेक जण देत असतात,हा बोध आपल्या मनात रूजलेला असेल तर आपले आत्मबल वाढवतो. आयुष्य असंच असतं, तुमच्या वेदना अनेकदा जगाला कळतं नाहीत. वेदनेवर घाव, जखमेवर मीठ चोळले जाते अशा परिस्थितीत संयमाचे बांध सुटू देऊ नये नियमांचे बंध तुटू देऊ नये अंधार फार काळ राहत नसतो यावरची श्रद्धा सुटू देऊ नये.

येथे क्लिक करा - महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद

तू झोपलास का

जागा आहेस

जेवलास का

उपाशी आहेस

तुझ्यावर वेदनेची सत्ता आहे

त्यांना कुठे पत्ता आहे?

कधी तुमच्या वेदना माहित नसतात जगाला म्हणून ती माणसं तशी वागतात,यात काही गैर नाही असे वाटून संयमाने आणि आत्मविश्वासाने वाटचाल केली पाहिजे. अपमान झाल्यामुळे दुःखी कष्टी होऊन झोपडीला ताटी लावून बसलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना प्रेरक विचार देऊन त्यांचे आत्मबल संत मुक्ताबाई यांनी जागवले.

संत मुक्ताबाई यांनी म्हटलं आहे.

जग झाले वन्ही

संतजन व्हावे पाणी |

तुम्ही तरोनी जग तारा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

या विचाराने मानवी मनाला बळ येते.

बळं देणारी माणसं

बळं देणारे विचार आपलं फार मोठ धन असते, या धनाला सोबत घेऊन वाटचाल केल्यास मानसिक आधार मिळतो, आत्मबळ मिळते.

- डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार

नांदेड जिल्ह्याच्या ताज्या घटना घडामोडीसाठी येथे क्लिक करा