esakal | महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद

बोलून बातमी शोधा

rohi pimpalgaon
महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात असलेल्या रोही पिंपळगाव येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष केल्याच्या कारणावरुन दुसऱ्या समाजातील तरुणांनी जातीय द्वेषातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला आहे. त्यानंतर आरोपींवर झालेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर गावाने दलित समाजावर बहिष्कार घातल्याची घटना घडली.

गावात दोन समाजात तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला.

हेही वाचा - नांदेड : आरडीएक्स म्हणून जप्त; सिंदी बनविण्याचे रसायन असल्याचा संशय, रेल्वे पोलिसांची उडाली झोप, पोलिस अधीक्षकांसह एटीएस पथकाकडून चौकशी

सदरील घटनेची माहिती देताना दलित समाजातील तरुण दीपक बळवंते याने सांगितले की, गावात द्वेष भावनेतून मध्यरात्री आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आहे. रोहिपिंपळगाव या गावात असाच एक प्रकार १५ वर्षांपूर्वी जयंतीची रॅली काढण्यावरुन झाला होता. त्यावेळीही अशाच प्रकारचा मज्जाव केल्याची आठवण तरुणाने सांगितली.

गुन्हादाखल झालेल्यांना अटक करावी, बौध्द वस्तीत बोअर पाडून द्यावा, येथील पोलिस चौकीत पोलिस तैनात करावा, जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी गायरान उपलब्ध करुन द्यावे, सामाजीक बहिष्कार विरोधी कायदा ता. तीन जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात लागु झाला आहे. तरी त्यानुसार कायदेशीर कारवाई करावी. तसेच बौद्ध वस्तीत महावितरणचा स्वतंत्र डीपी बसविण्यात यावा या मागण्यांसाठी रोहि पिंपळगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

राहूल चिखलीकर, प्रा. राजू सोनसळे, अतिश ढगे, अभय सोनकांबळे, विनोद नरवाडे, भिमराव बुक्तरे, प्रा. राज अटकोरे, कपील वाठोरे, देवानंद क्षिरसागर, बापूराव केळकर, पांडूरंग केळकर, भगवान बसवंते, संजय हनमंते, अनिल केळकर, समाधान निखाते, विठ्ठल हनमंते, रेखाबाई नरवाडे, शोभाबाई केळकर, अंजनाताई केळकर, छायाबाई हनमंते, पुष्पाई हनमंते, अंजानबाई हटकर, अरुणाबाई क्षिरसागर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पाॅईन्टर

तणावानंतर संपूर्ण गावाचा दलित समाजावर बहिष्कार.

किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद केल्याचा दावा.

पोलिसांकडून नागरिकांना वाद मिटवण्याचं आवाहन.