ऐकावे ते नवलच : चक्क ‘या’ गावात गाय आणि म्हैस पाळत नाहीत

file photo
file photo

घोगरी (जिल्हा नांदेड) : निसर्गाच्या अवकृपेमुळे सिंचन व कोरडवाहू (गायरान) शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाची हमी नसल्याने, या भागातील बहुतांश बळीराजा पर्यायी उत्पादनाचे स्त्रोत म्हणून “दुभती पशुधन ” पाळण्यावर अधिक भर देत असतो. शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. परंतु, गवतवाडी (ता. हदगाव) हे खेडेगाव यास अपवाद ठरले असून “जेथे भरेल दरा, तेच गाव खरा” म्हणून या गावाची बरीच कुटुंबीय पावसाळा संपताच रोजंदारीच्या शोधात स्थलांतरित होतात. यामुळे दुभती जनावरे पाळायची कुणी? असा प्रश्न उभा राहिल्याने, गावात एकही दुभती (म्हैस व गाय) नाही. यामुळे हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

हे गाव जवळपास चौदाशे लोकवस्तीचे असून, पूर्णपणे आदिवासीबहुल आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असल्याने पाण्याचे स्त्रोत अगदी खोलवर आहेत. यामुळे येथील सिंचन क्षेत्र अगदी बोटावर मोजण्याएवढे आहे. बहुतांश जमिनी या गायरान असल्याने संपूर्ण भिस्त ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने तसेच या परिसरात निसर्गाची अवकृपा होण्याने गायरान जमिनीत पेरलेली पिके कापूस, उडीद, मुग, तुर, वाया जात असल्याने टाकलेला ही खर्च निघत नाही. यामुळे कुटुंबीयांचा खर्च भागवायचा कसा या विवंचनेत येथील बरीचशी कुटुंबे पावसाळा संपताच घराला कुलूप ठोकून बाहेरगावी गेलेली आढळतात.

गवतवाडी सारख्या डोंगर पायथ्याशी

शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व महत्त्वाचा व्यवसाय आहे. या परिसरातील बहुतांश बळीराजा हा जोडधंदा म्हणून संकरीत गाई, देशी गाई, गावठी दुधाळ गाई, म्हशीचे संगोपन करीत असल्याने यातून मिळणाऱ्या मिळकतीतून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. परंतु गवतवाडी सारख्या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावात, मात्र जमीन खडकाळ व पाषाणयुक्त असल्याने, पाण्याचे स्तोत्र अगदी खोलवर आहेत. यामुळे उन्हाळ्यात या गावात तीव्र पाणीटंचाई भासते. व काही सिंचनधारकांनी रब्बी हंगामातील पेरलेली पिके पाण्याअभावी वाया गेलेली दिसून येतात. अशी या गावची गंभीर समस्या असतानाच? या गावात दुभती जनावरे पाळायची कशी? ही कठीण समस्या आहे.

रोजंदारीच्या शोधात “जेथे भेटेल दरा, तेच गाव बरा”

खरे पाहिले तर पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खताने शेत जमीन नापीक होत चालली असतानाच या गावात प्रगत शेतकऱ्याकडे शेतीसाठी लागणारे उपयुक्त बैलजोडी सोडली तर, इतर जनावरे शोधुनही सापडणार नाहीत यामुळे या गावचे कुतूहल वाटण्याजोगे आहे. इतर भागात बळीराजा आणि शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाला मुख्य व्यवसाय मानले आहे. यामुळे रोजचे दूध, रोज पैसा, शेतकऱ्याच्या हाती खेळू लागला असल्याने इतर शेतकऱ्यांची या पशुधन पालनामुळे क्रयशक्ती वाढून, आर्थिक सुबत्ता चांगली बनली असल्याने इतर समस्या सुटण्यास मदत मिळत असतानाच येथील कास्तकार मात्र रोजंदारीच्या शोधात “जेथे भेटेल दरा, तेच गाव बरा” जेथे पोटासाठी बरी सोय होईल तेच ठिकाण चांगले म्हणून दिवस कंठीत आहे.

धावंडा, सीताफळे, तेंदूपत्ता, चारोळ्या, मोहफुल या सुगीवर अवलंबून

तर काही गावात राहिलेले वनमजुर दार, शेतकरी या भागातील वन संपदापासून मिळणाऱ्या धावंडा, सीताफळे, तेंदूपत्ता, चारोळ्या, मोहफुल या सुगीवर अवलंबून असून यातून मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यात मग्न आहेत. हालाकीचे जीवन जगणाऱ्या वनमजुरदार व बळीराजा, महागडी दुभती जनावर आणणार कुठून? हा प्रश्न महत्त्वाचा आहे?

प्रतिक्रिया....... 

गावा शेजारीच विपुल वनसंपदा असल्याने, या जंगलात पाळीव शेळ्या सारणे सोयीचे ठरत असल्याने, शेळी पालन व्यवसाय आजही टिकून असल्याने शेळ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्याकडे गायरान पट्टी शेती असल्याने निसर्गाच्या भरवशावर शेती अवलंबून आहे. यामुळे दुधाळ म्हशी पाळण्याची इच्छा असूनही, चाऱ्याअभावी पाळल्या जात नाहीत. यामुळे या गावात एकही पाळीव दुधाळमहीश नाही....... 
- मारुती मेटकर, सरपंच प्रतिनिधी, गवतवाडी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत जी गावे सदर योजनेत समाविष्ट झाली आहेत त्या गावातील भूमिहीन शेतमजूरास शेळी पालनासाठी अनुदान देण्याचा प्रावधान आहे. तो गवतवाडी हे गाव या योजनेत समाविष्ट झाले नसल्याने, बरेच मजूरदार कुटुंबीय या लाभापासून वंचित राहणार आहेत. तरी हे गाव या योजनेत लवकर समाविष्ट होणे गरजेचे आहे... 
- राम मिराशे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, गवतवाडी.

हा भाग वन संपदेने नटलेला असल्याने या भागात पूर्वी मुबलक पाणी पडत असे. यामुळे आमच्याकडे वडिलोपार्जित पशुधन मोठ्या प्रमाणात होते. गावातील कुणीही व्यक्ती दूध, दही, ताक नेण्यासाठी घरी आला तर मोफत दिले जात असत. परंतु आता निसर्गाच्या अवकृपेमुळे पशुधन पाळणे बंद केले आहे.....
- रामकिशन धोत्रे, सदन शेतकरी, गवतवाडी.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com