Video - प्राथमिक शिक्षकांच्या ‘या’ आहेत प्रलंबित मागण्या... 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 9 September 2020

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने मंगळवारी नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. 

नांदेड - राज्यातील जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने पदाधिकारी आणि सदस्यांनी मंगळवारी (ता. आठ) अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. त्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यात एकाच वेळी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्यामार्फत तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. 

हेही वाचा - नांदेडला मंगळवारी ३३२ पॉझिटिव्ह; बरे होण्याचे प्रमाण वाढले

शिक्षकांच्या या आहेत मागण्या
शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी, ता. एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, ता. एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या ज्या कर्मचाऱ्यांच्या अपघाती, नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी. ता. २९ सष्टेंबर २०१८ चा शासन निर्णय रद्द करावा, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभार्थी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगत योजना लागू करावी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांतून भरण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत. कोरोनाबाबत कर्तव्य बजावताना ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना तातडीने पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण अनुदान मिळावे. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या आॅनलाइन पद्धतीने करण्यात याव्यात. मुख्यालयी राहण्याबाबतचे राज्य शासनाचे पत्र रद्द करण्यात यावेत. जिल्हा गुरूगौरव पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना शासनाने दिलेल्या वेतनवाढीच्या रक्कमेची वसुली सेवानिवृत्तीच्या पेन्शन रक्कमेतून कपात केली जात आहे. ती वसुली थांबवावी. तसेच २००८ नंतरच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांप्रमाणे रोख रक्कम देण्यात यावी, या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.  

हेही वाचलेच पाहिजे - दीड टक्क्याचा मोह पडला भारी, महिला उपजिल्हाधिकाऱ्याला अटक...

यांची होती उपस्थिती 
यावेळी राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पद्माकर कुलकर्णी, दिगंबर कुरे, संभाजी आलेवाड, वर्षा नळगीरे, माधवी पांचाळ, संजय मोरे, बळवंत मंगनाळे, कविता ताटे, सारिका आचमे, वर्षा भोळे, भगवान बकवाड, मंगल नवहारे, जी. जी. गरुडकर आदी उपस्थित होते. राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांची दखल घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणुक करुन शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Elementary Teachers' Pending Demands ..., Nanded news