शेतकऱ्यांवर ‘कुणी ऊस नेतं का ऊस’ म्हणण्याची वेळ

कारखाना कर्मचारी व ठेकेदारांकडून अडवणूक ः ६० टक्के ऊस शेतातच उभा
Sugarcane
Sugarcanesakal

वडवणी : वडवणी तालुक्यात एकूण ४० हजार ५०० हेक्टर जमिनीपैकी ३४ हजार ३६६ हेक्टर क्षेत्र बागायतीयोग्य आहे. त्यापैकी ७ हजार ६३० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आहे. आता ऊसतोडणीवर आला आहे. तेलगाव कारखाना वगळता या क्षेत्रात गेल्यावर्षी ऊस घेऊन जाणाऱ्या कारखान्याकडून वडवणी तालुक्यात ऊस तोडणीसाठी टोळी दिली जात नसल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांतून होत आहे. नोंद असून देखील ऊस तोडला जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी तालुक्यातील ६० टक्के शेतकऱ्यांचा जवळपास चार हजार हेक्टरवरील ऊस शेतातच उभा आहे.

बारा महिने जिवापाड जपून रात्रीचे पाणी देऊन मोठा केलेला ऊस तोडणीला आल्यानंतर कारखाने घेऊन जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. २०२०-२१ च्या गाळपावेळी नोव्हेंबरमध्येच तालुक्यातील ऊस कारखान्याने तोडला होता.

यावर्षी संबंधित शेतकऱ्यांचा ऊस इतर कारखाने नेण्यास नकार देत आहेत. कारखाना वेळकाढूपणा करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडे नोंद असूनही एक एकर ऊस तोडण्यासाठी तब्बल दहा हजार मोजावे लागत आहेत. ऊसतोड ठेकेदार व मजुरांनी मागणी केलेली रक्कम मिळाली तरच ऊस तोडला जात आहे.

तर ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करू नये व मजुरांना शेतकऱ्यांनी नाही तर कारखान्याने पैसे द्यावे असे साखर आयुक्तांनी कारखाने सुरू होण्याच्या अगोदर आदेश दिले आहेत. मात्र वडवणी तालुक्यात काही कारखान्यांच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. ऊसतोड ठेकेदारासह कारखाना कर्मचारी देखील शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका कारखान्याच्या स्लीप बॉयने तर कारखान्याला नोंद करायची असेल तर दोन हजार रुपये एकर असा भाव ठरवला आहे आणि नोंद घेतलेल्या ऊस तोडणीसाठी या स्वयंघोषित साहेबाला पाच हजार रुपये द्यावे लागत आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. होणारी ही लूट थांबवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

''मी अगोदरच शेतकऱ्यांना सांगितले होते कोणी पैशाची मागणी करत असेल तर देऊ नका. तरीदेखील ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांनी कारखान्याकडे तक्रार अर्ज करावा. मी त्यांचे पैसे परत देईल. आम्ही शेतकऱ्यांच्या जिवावर कारखाना चालवत आहोत. त्यामुळे जे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन नोंद करणे किंवा ऊसतोड देणे असले प्रकार करत असतील आणि याबद्दल काही पुरावा मिळाला तर निश्चित कार्यवाही केली जाईल. वडवणी तालुका हा आमच्याकडे गेटकेनमध्ये येतो. आमच्या क्षेत्रातला ऊस गेल्यानंतर आम्ही वडवणी तालुक्यातील ऊस देखील घेऊन जाणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिघाई करून कोणालाही पैसे देऊ नये.''

- सुजय पवार, शेतकी अधिकारी, जयमहेश साखर कारखाना, माजलगाव

''सुरुवातीला पाच हजार रुपये द्यावे लागत होते. नंतर एक टोळी आली. त्यांनी एक एकर ऊस तोडण्यासाठी दहा हजार रुपये मागितले. एवढे पैसे कोठून द्यायचे म्हणून मी पैसे नाही म्हणालो तर ते ऊस न तोडताच टोळी परत निघून गेली.''

- उत्तमराव लंगे, शेतकरी, मामला.

''गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऊस तोडला होता. आता उसाला सोळा महिने झाले आहेत तरीदेखील ऊसतोडणी सुरू झालेली नाही. गेल्या वर्षी जयमहेशला ऊस दिल्याने यावर्षी दुसरा कारखाना आमचा ऊस घेऊन जात नाही आणि जयमहेश कारखान्याच्या टोळीवाल्यांना इतके पैसे देणे आम्हाला परवडत नाही.''

- बळीराम खाडे, शेतकरी सळिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com