बरडशेवाळा येथील गुळाची चवच भारी; पन्नास कामगारांच्या हाताला काम

प्रभाकर दहीभाते
Thursday, 14 January 2021

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गावालगत मस्के कुटुंबात पंधरा हेक्टर जमीन आहे.

बरडशेवाळा ( जिल्हा नांदेड ) : एकत्र कुटुंब असले तर त्याचा काय फायदा होतो हे सिध्द करुन दाखविले एका बरडशेवाळा ( ता. हदगांव) येथील शेतकऱ्याने. स्वत: गुळाचा चरखा टाकून त्याने आपल्या परिवारातील सदस्यांसह इतर पन्नास लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या गुळाची चव चांगली असल्याने अनेक भागात गुळ विक्री होत आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्नसुध्दा मिळत आहे. 

बरडशेवाळासह परीसरात एका विचाराने राहिलेले सर्वात मोठे कुटुंब म्हणून  कै. विठृलराव सोनबाराव मस्के यांचे कुटुंब परिचीत आहे. कै. विठ्ठलराव यांच्या निधनानंतर पत्नीने एक विचार ठेवला. सहा महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यांना चार मुले, चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. तो आजही एकविचार असल्याने त्यांनी पन्नास कामगारांच्या मदतीने सुरु केलेल्या गुळाच्या कारखान्यातून निघणाऱ्या गुळाला चांगली मागणी आहे.

हेही वाचा - बर्ड फ्लूची धास्ती : भोकर पशुसंवर्धन विभागाची पोल्ट्रीफार्मला भेट

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गावालगत मस्के कुटुंबात पंधरा हेक्टर जमीन आहे. दोन विहीर असल्याने ऊस लागवड केली. मस्के कुटुंबानी काही वर्षांपूर्वी छोटा चरख गुळ कारखाना सुरू केला होता. त्या अनुभवाचा फायदा घेऊन एक महिन्याअगोदर आमदार माधवराव जवळगावकर यांच्या हस्ते कारखान्याचे उदघाटन केले होते. सध्या या ठिकाणी पन्नास कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने ये- जा करत असताना दररोज मोठ्या प्रमाणात किरकोळ व ठोक गुळ नेण्यासाठी बरडशेवाळा, पळसा, मनाठासह परीसरातील ग्राहक येत आहेत. तर बाजारपेठेत नैसर्गिक गुळाला चांगली मागणी होत असल्याने व्यापारी कारखान्यावरुन गुळ नेत आहेत. गावासह परीसरातील ऊस खरेदी करुन शेतकऱ्यांना योग्य भाव देत असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. कारखान्यातुन चांगला फायदा मिळत असल्याचे शेतकरी सोनबाराव मस्के यांनी सांगितले

वडीलांची एकोप्याची विचारसरणी कुटुंबाला फायदेशीर व समाधानी ठरली असून पुर्वी छोटा चरख केला असल्याने त्या अनुभवातून हिंमत करून गुळाचा कारखाना उभा केला. गुळाला चांगली मागणी होत असल्याने कुठेही न जाता व्यापारी जागेवर येऊन गुळ घेऊन जात आहेत. दररोज किरकोळ मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. भावात चढ उतार होत असते. घरी तिनं ट्रक्टर असल्याने परीसरातील ऊस खरेदी करुन पुढील काळात आणखी कारखाना प्रगती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
- सोनबा मस्के, शेतकरी, बरडशेवाळा.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The jaggery flavor at Baradshewala is handcrafted by fifty workers nanded news