जालन्याचा पिस्तुलधारी युवक नांदेड पोलिसांच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 18 October 2020

अशाच या पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या जालना येथील एका युवकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस व एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई इतवारा पोलिसांनी भंगार लाईन परिसरात शुक्रवारी (ता. १६) केली.

नांदेड : शहर व जिल्ह्यात मागील काही काळापासून गावठी कट्टे व जीवंत काडतूस अटक केलेल्या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेले आहे. मात्र हे पिस्तुल येतात कोठून याच्या मुळापर्यंत पोलिसांचा तपास गेला नाही. पिस्तुल व खंजर, तलवार मिळणारे कोठार म्हणून नांदेडमधील गुन्हेगारी जगतातील मंडळी पाहत असते. या ठिकाणी हे घातक शस्त्र सहज मिळतात. अशाच या पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या जालना येथील एका युवकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस व एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई इतवारा पोलिसांनी भंगार लाईन परिसरात शुक्रवारी (ता. १६) केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. 

जुन्या नांदेड शहरातील भंगार लाईन चौक भागात हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला इतवारा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भंगार लाईन परिसरात जालना येथील युवक रणवीरसिंग देविदास पवार हा दुचाकी (एम एच२६-६१७४) वरून फिरत असून तो पिस्तूल आणि जिवंत काडतूस विक्री करत असल्याची माहिती इतवारा पोलिस ठाण्याचे निरिक्षक साहेबराव नरवाडे यांना मिळाली. त्यांनी सापळा लावून सदर आरोपीस भंगार लाईन परिसरातून ताब्यात घेतले.

हेही वाचापरभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली 

इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा 

पोलिस ठाण्यात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच तो वापरत असलेली वरील क्रमांकाची दुचाकी जप्त केली. याप्रकरणी हवालदार गणपत कोंडे यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास फौजदार श्री गीते करत असून मागील काळात त्याने किती व कोणाला पिस्तूल विकले याची माहिती घेण्यात येणार आहे. 

यासोबतच जुन्या पुलाखाली युवकाकडून खंजीर जप्त

जुना मोंढा भागातील पुलाखाली राम मंदिर परिसरात एक युवक खंजीर घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक खंजर आढळून आले. तो खंजर जप्त करुन संबंधीत युवकाविरुद्ध (आकाश भगवान पवार राहणार नसरतपुर) गुन्हा दाखल केला. 

येथे क्लिक करा Video - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

जुगार अड्ड्यावर धाड  

जिल्ह्यात तीन ठिकाणी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रक्कम जप्त केली. तसेच दोघांना अटक करण्यात आली. मुखेड येथे कब्रस्थान परिसरात कल्याण नावाचा मटका सुरू होता. त्या ठिकाणाहून दीड हजार रुपये जप्त केले. त्यानंतर वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत एनटीसी मीलच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून बाराशे रुपये तर किनवट ठाण्याच्या हद्दीत वीटभट्टी जवळ जुगार अड्ड्यावर छापा मारुन रोख रक्कम जप्त केली. अटक केलेल्या जुगाऱ्यांवर मुखेड, वजिराबाद आणि किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna's pistol-wielding youth caught by Nanded police