Jintur: ‘येलदरी’तून साडेनऊ कोटींची वीजनिर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येलदरी
५८ दिवसात साडेनऊ कोटींची वीजनिर्मिती : येलदरी येथील जलविद्युत केंद्राची गौरवास्पद कामगिरी.

जिंतूर : ‘येलदरी’तून साडेनऊ कोटींची वीजनिर्मिती

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणालगतच्या जलविद्युत केंद्राद्वारे गेल्या ५८ दिवसांत तब्बल नऊ कोटी ५६ लाख १३ हजार रुपयांची तीन कोटी आठ लाख ६९ हजार युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या विजेचा तुटवडा जाणवत असताना जलविद्युत केंद्राची ही कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून सिंचन, वीज निर्मितीच्या उद्देशाने येलदरी येथे पूर्णा नदीवर ९३४.४४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचे धरण १९६८ मध्ये उभारले गेले. लगतच जलविद्युत प्रकल्प १९६९ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. येथे तीन संचाद्वारे २२.५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात धरणाच्या लाभक्षेत्रात अति पाऊस झाला. त्यामुळे येलदरी धरण पूर्ण भरले. सातत्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. शिवाय ऊर्ध्व भागातील खडकपूर्णा धरण तुडुंब झाल्याने अतिरिक्त पाणी येलदरीत येत होते.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

अतिरिक्त पाण्यावर सात सप्टेंबरला मध्यरात्री केंद्रातील तिन्ही संच सुरू करण्यात आले. ते तीन नोव्हेंबरला बंद करण्यात आले. ५८ दिवस अखंडितपणे संच कार्यान्वित होते. त्यातून ३ कोटी ८ लाख ६९ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. महावितरण कंपनीला ९ कोटी ५६ लाख १३ हजार रुपये उत्पन्न मिळाले. वीजनिर्मितीत व्यत्यय येऊ नये यासाठी कार्यकारी अभियंता बी.एम.डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यु.एस.पाटील, उप कार्यकारी अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली.

एका दिवसातील उच्चांक

येलदरीतील प्रकल्पातून सात ऑक्टोबर या एकाच दिवशी विक्रमी म्हणजे पाच लाख ५२ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. दिवसभरातील कामगिरीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

loading image
go to top