नांदेडच्या कामेश्वरने दिल्लीच्या तख्तावर नाव कोरले; प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कारासाठी निवड- आमदार श्यामसुंदर शिंदे 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 23 January 2021

कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवासी असलेला धाडसी बालक कामेश्वर वाघमारे (वय १३) यांनी ऋषी महाराज मठाजवळील मन्याड नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात तिन शाळकरी मुले बुड़त असताना पाहिले.

नांदेड : आपल्या जिवाची पर्वा न करता दोन मुलांचा जिव वाचविणार्‍या घोडज येथील कामेश्वर वाघमारेची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडे केला होता पाठपुरावा.
 
कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवासी असलेला धाडसी बालक कामेश्वर वाघमारे (वय १३) यांनी ऋषी महाराज मठाजवळील मन्याड नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात तिन शाळकरी मुले बुड़त असताना पाहिले. कामेश्चरने आपल्या जिवाची पर्वा न करता बुडत असलेल्या ओम विजय मठपती (१६ वर्ष), गजानन विश्वनाथ श्रीमंगले ( १४ वर्ष ), अजित कोंडीबा दुंडे (वय १४ वर्ष) या मुलांना वाचवण्यासाठी मन्याड नदीत उडी घेऊन दोघांना मोठ्या ध्यैर्याने वाचवण्यात यश मिळाले होते. परंतु ओम मठपती या बालकास वाचवण्यात अपयश आले होते. 

त्याच्या या धाडसी व जिगरबाज कार्याची दखल लोहा- कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली व कामेश्वर वाघमारेचा त्यावेळी आ. शिंदे यांनी सत्कार करुन कौतूक केले होते. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्हाधिकारी यांना भेटून कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी वेळोवेळी आ. शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर केली होती.

आ. शिदे यांच्या सततच्या तळमळीच्या पाठपुरावाला अखेर यश आले असून केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने ता. 22 जानेवारीच्या पत्रकान्वये घोडज येथील धाडसी कामेश्वर वाघमारेला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार घोषीत केला असल्याने लोहा- कंधार मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. धाडसी कामेश्वर वाघमारेला एका शानदार कार्यक्रमात ता. २५ जानेवारी २०२१ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आ. श्यामसुंदर शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंद यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kameshwar of Nanded carved a name on the Delhi throne Selected for the Prime Minister's Child Hero Award MLA Shyamsunder Shinde nanded news