संकटांची शिदोरी आमच्याच पाठीशी कारे देवा ?

बाबूराव पाटील
Wednesday, 26 August 2020


भोकर तालुक्यात बागायतीपेक्षा कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक प्रमाणात असल्याने पंचक्रोशीतील अनेक शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सुधा प्रकल्प सोडला तर अन्य कोणताही मोठा जलाशय प्रकल्प नाही. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना फारशी प्रभावीपणे राबविण्यात आली नसल्याने भूर्गभातील पाणीपातळी वाढली नाही. पेरणीस लाभदायक असलेल्या मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने बळिराजा सुखावला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन, हळद, मूग, उडीद यासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली.

भोकर, (जि. नांदेड) ः भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सुजलाम सुफलाम धरतीमाता बळिराजाची खऱ्या अर्थाने लक्ष्मी होय...अशात निसर्ग लहरी बनल्याने त्याचा फटका शेती व्यवसायाला बसतो आहे. यंदा वरुणराजा मेहरबान झाल्याने खरीप हंगामातील पिके बहरून आली होती. अशातच संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अस्मानी संकटाची शिदोरी बळिराजाच्या पाठीवर सदैव बांधलेली असते. मनोभावे तुझी सेवा करूनही आमचंच नशीब फुटकं कारे...देवा ? अशी केविलवाणी विनंती हवालदिल झालेला शेतकरी करतो आहे.

 

भोकर तालुक्यात बागायतीपेक्षा कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक प्रमाणात असल्याने पंचक्रोशीतील अनेक शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सुधा प्रकल्प सोडला तर अन्य कोणताही मोठा जलाशय प्रकल्प नाही. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना फारशी प्रभावीपणे राबविण्यात आली नसल्याने भूर्गभातील पाणीपातळी वाढली नाही. तालुक्यातील पावसाची सरासरी ही एक हजार मिलिमीटर इतकी आहे‌. सरासरी कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसतो आहे. यंदा रोहिणी नक्षत्र वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. पेरणीस लाभदायक असलेल्या मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने बळिराजा सुखावला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन, हळद, मूग, उडीद यासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली.

हेही वाचा -  नांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह

 

एकापाठोपाठ एक नक्षत्र हे निमंत्रण दिल्यागत वेळेवर बरसायला सुरवात झाली. खरीप पिके अगदी जोमात आली. रान हिरवगार पाहून शेतकरी आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलून आलं असताना ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस बरसला. उठाव असलेल्या रानातील पीक तग धरून होते; पण जे चिबाडी आणि काळ्यामातीची शेती आहे ती शेती चिबाडली आहे. हातातोंडाशी आलेले मूग, उडीद पिकांची नासाडी झाली. शेंगांना मोड फुटली. कापूस आडवा पडून बुडातून खीळखीळ झाला आहे. शेतात पाणी साचून आहे. खरीप हंगामातील उत्पन्न समाधानकारक होईल अशी अपेक्षा शेतकरी उराशी बाळगून होता; पण तेही स्वप्न भंगले आहे. पावसाने थोडी उसंत दिली तर उर्वरित पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते अशी आशा आहे.

 

सुधा प्रकल्प ४३ टक्के भरला
भोकर तालुक्यात शेती सिंचनासाठी मोठा असलेला एकच सुधा प्रकल्प आहे. तालुक्यासाठी वरदान ठरलेला हा प्रकल्प यंदा केवळ ४३ टक्के इतकाच भरला आहे. आणखी पन्नास टक्के भरणे आवश्यक आहे. कारण शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील इतर लघुतलावातील पाण्याची पातळी ः कांडली (४४.२६), भूरभुशी (६.२५), रावणाला (०), आमठाणा (११.७१), किनी (१.५०) अशी असून आतापर्यंत ६६२.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नुकसानीचे पंचनामे करावे
तालुक्यात नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे मूग, उडीद, पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सदरील पिकांची महसूल विभाग आणि कृषी विभागानी संयुक्त पाहणी करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देऊन धीर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kharif Crop Was Harvested In Bhokar, Nanded News