खरीप हंगाम गेला, आता मदार रब्बी हंगामावर

nnd27sgp15.jpg
nnd27sgp15.jpg

देगलूर, (जि. नांदेड) ः मुसळधार पावसाने मूग पूर्ण गेले, उडीदालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला तर उत्तरा नक्षत्रातील पाण्याने तर कहरच केला. सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटेपर्यंत पाणी शेतात पडले, शेतातले पाणी गावात आले, अनेकांचा निवाराही या पावसाने हिरावून नेला. अनेक वर्षापासून सरासरीच्या जवळपासही न भटकणारा पाऊस या वर्षी मात्र सप्टेंबरमध्येच सीमापार झाला. नदी-नाले तुडुंब भरली अन् प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी उत्पन्नातून हाती पडायचे आता काही शिल्लक राहिले नाही.


शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत सापडल्याचे भेसूर चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. खरिपातील कोणतेच पीक हाती लागण्याची शक्यता धूसर बनल्याने येत्या रब्बी हंगामावर पुढील वर्षभराची मदार अवलंबून आहे. पाऊस थांबायला तयार नसल्याने रब्बी हंगाम हुकला तर वर्षभर मुक्या प्राण्यांना तसेच शेतकऱ्यांनाही खायचे वांदे होतील अशीच परिस्थिती सध्या आहे.  (ता.२६) रोजी हस्त नक्षत्रचा प्रवेश झाला असून यामध्येही पाऊस थांबायला तयार नाही. या नक्षत्रात करडई, तीळ यासारख्या कडधान्य पिकांची पेरणी सुरू करणे क्रमप्राप्त असतानाही अजून आठ दिवस तरी शिवारात जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. येत्या (ता.दहा) ऑक्टोंबर रोजी निघणाऱ्या चित्ता नक्षत्रात रब्बी पेरणीला प्रारंभ केला जातो, मात्र यावर्षी शेतातील पाणीच बाहेर निघायला तयार नसल्याने रब्बीची पेरणी करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलेला आहे. 

दहा वर्षातील पावसाचा उच्चांक
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९०० मिमी आहे. आजपर्यंत तालुक्यात ११०० मिमी पाऊस झाला, त्यातही माळेगाव मंडळात तर सीमा पार करीत १२२३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. देगलूर मंडळात ११५७ मिमी, खानापूर मंडळात ११०० मिमी, शहापूर ९८१ मिमी, हनेगाव मंडळात १०१६ मिमी पाऊस झाल्याने सहाही मंडळात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

घरांची पडझड मोठ्या प्रमाणात
सरासरीपेक्षा कितीतरी पटीने पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला. त्यातही खानापूर, बल्लूर, करडखेड, मनसकरगा, वझरगा, तुपशेळगाव, कावळगाव, सुगाव, तमलूर, शेळगाव, शेवाळा या गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे अनेकांचा हक्काचा निवाराही निसर्गाने हिरावून नेल्याने त्यांची आबाळ झाली. 

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पावसाने तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची मागणी प्रहार, भाजप व इतर संघटनांनी शासनाकडे केली आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com