संगणक साक्षरते अभावी ऑनलाइन शिक्षणात सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडथळा  

शिवचरण वावळे
Wednesday, 9 September 2020

कोरोना संकट येणार म्हणून कुणालाही माहित नव्हते, अच्यानक उद्भवलेल्या या संकटामुळे सर्वच क्षेत्रास मोठी हानी पोहचली आहे. शिक्षण क्षेत्रातमध्ये सुद्धा कोरोना मुळे अनेक बदल दिसून येत आहेत. त्यातील आॅनलाईन शिक्षण पद्धती हा एक महत्वाचा बदल आहे. परंतु बदलास सामोरे जाताना केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर पालक आणि शिक्षकांची देखील दमछाक होताना स्पस्ट दिसून येत आहे. आणि आॅनलाईन शिक्षणाचा पर्ता बोजवारा उडत आहे.

नांदेड - कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन शिक्षणपद्धतीवर अधिक भर दिला जात आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धती चांगली असली तरी त्यात अनेक अडथळे येत असल्याने शहर वगळता गाव, वाडी, तांड्यावरील सत्तर टक्के विद्यार्थी, पालकांना ही शिक्षणपद्धती अडथळ्याची ठरत आहे. 

महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी घरची माहिती देताना घरच्या पत्त्यासह वडील, भाऊ किंवा शेजारच्यांचा फोन नंबर दिला असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. त्यामुळे जेव्हा ऑनलाइन क्लास सुरू असतो तेव्हा ‘गुगल मीट’च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पालक किंवा भावाचा मोबाईल नंबर दिल्याने क्लासच्या वेळी मोबाईल उपलब्ध नसतो. म्हणून गावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासला मुकावे लागत आहे. अनेकांच्या घरी ॲन्ड्रॉईड मोबाईलच नसल्याचे देखील एका प्राध्यापकाने सांगितले. 

हेही वाचा- नांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह  दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू​

संगणकीय साक्षर नसलेले पालक व विद्यार्थ्यांना सुद्धा फटका

पुढील काही दिवसांमध्ये शाळा, महाविद्यालय सुरू होणार असल्याचे संकेत केंद्र शासनाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी ऑनलाइन सराव परीक्षा देखील घेणे सुरू आहे. परंतु अनेकांच्या गावात मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट सुविधा पोचलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सराव परीक्षांना देखील मुकावे लागू शकते. अचानक उद्भवलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे संगणकीय साक्षर नसलेले पालक व विद्यार्थ्यांना सुद्धा फटका सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा- नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा... ​

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षक दुरावले
 जेव्हा क्लास सुरू असतो तेव्हा शिक्षकांसमोर विद्यार्थी बसलेले असतात, तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांचे भावनिक नाते तयार होते. कुठलाही विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यास अडचण आल्यास जागेवर त्यांच्या शंकांचे सहज निरसन करता येते; परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षक दुरावले आहेत. ऑनलाइन शिक्षणपद्धती चांगली असली तरी सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा सारखाच फायदा होतो असे आताच्या परिस्थितीत सांगणे सयुक्तिक ठरणार नाही. 
-प्रा. डॉ. व्यंकट पावडे, के. आर. एम. महिला महाविद्यालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of computer literacy hinders seventy percent of students in online learning Nanded News