हेमाडपंथी मंदिरावर कोसळली वीज

अनिल कदम
Saturday, 19 September 2020

शुक्रवारी (ता.१८) रात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसात खानापूर येथील हेमाडपंथी महादेवाच्या मंदिरावरील कळसावर वीज कोसळून मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कावळगाव येथील धनराज लगडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या पावसाने भोकसखेडा येथील नवीन व जुन्या वसाहतीतून जाणाऱ्या नाल्याला मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने दिवसभर गावकऱ्यांचा संपर्क तुटला होता, तर अनेकांच्या घरात पाणीही घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. 

देगलूर, (जि. नांदेड) ः गेल्या रविवारपासून सुरू झालेला पाऊस थांबायला तयार नाही. आठ दिवसांपासून तालुक्यात सूर्यदर्शनही झाले नाही. पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, नदीनाल्याचे पाणी गावात आल्याने किनी, बल्लूर, मनसकरगा, भोकसखेडा, खानापूर येथील घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

हेही वाचा -  लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले

शुक्रवारी (ता.१८) रात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसात खानापूर येथील हेमाडपंथी महादेवाच्या मंदिरावरील कळसावर वीज कोसळून मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कावळगाव येथील धनराज लगडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या पावसाने भोकसखेडा येथील नवीन व जुन्या वसाहतीतून जाणाऱ्या नाल्याला मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने दिवसभर गावकऱ्यांचा संपर्क तुटला होता, तर अनेकांच्या घरात पाणीही घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. 

पंधरा वर्षांनंतर पावसाने सरासरी ओलांडली
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाने सरासरी प्रजन्यमानही गाठलेले नव्हते, गेल्या चार वर्षांपासून ४५० मिमीच्या पुढे पाऊस तालुक्यात पडलेला नव्हता. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९०० मिमी असताना यावर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ९२०. ६१ मिमी पर्जन्यमान झाले. देगलूर मंडळात ९२०, खानापूर मंडळात ९१२, माळेगाव मंडळात १०८१, हानेगाव मंडळात ९०९ मिमी, शहापूर मंडळात ८२८, तर मरखेल मंडळात सर्वांत कमी ७१० मिमी पर्जन्यमान झाले. 

खानापुरात कोसळली वीज 
शुक्रवारी रात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसात खानापूर येथील हेमाडपंथी मंदिरावरील कळसावर वीज कोसळली. त्यामुळे कळसाच्या बाजूला असलेल्या मूर्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सुदैवाने जीवित हानी मात्र झाली नाही. कावलगाव येथील एकाच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले, तर किनी बल्लूर गावातही घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली. 

शेतकऱ्यांच्या शेतातील मूग, सोयाबीन, कापूस, तूर व उडीद आदी पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीचा हात द्यावा. 
- सुभाष साबणे, माजी आमदार. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning Strikes Hemadpanthi Temple, Nanded News