अबब...! दारुचा ट्रक उलटला, मग काय...? घे बॉक्स पळ....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

येथील नागरिकांना समजताच त्यांनी धावाधाव करत देशीचे बॉक्स पळविले. जामगावच्या तळीरामांना दोन महिण्यानंतर फुकट दारु भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिली नव्हती. 

नांदेड : नांदेडहून देशी दारुचे बॉक्स उमरी (स्टेशन) येथे नेत असतांना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक रस्‍त्याच्या बाजूला पलटला. ही माहिती जवळच असलेल्या जामगाव (ता. उमरी) येथील नागरिकांना समजताच त्यांनी धावाधाव करत देशीचे बॉक्स पळविले. जामगावच्या तळीरामांना दोन महिण्यानंतर फुकट दारु भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिली नव्हती. 

दोन महिन्यांच्या खंडानंतर देशी दारूच्या विक्रीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता. १८) परवानगी दिली होती. त्यावरून मंगळवारी (ता. १९) सकाळीच दारु दुकाने उघडली. त्यामुळे रांगेत राहून का होईना तळीरामानी दारुची खरेदी केली. शहरात सर्वत्र दारु दुकानावर गर्दीचा महापूर पहावयास भेटला. मात्र चोख पोलिस बंदोबस्त असल्याने तळीरामांनी गोंधळ न करता आपल्या आवडीचे पेय खरेदी केले.  नांदेड येथून उमरीकडे देशी दारूचे बॉक्स घेऊन ट्रक (एमएच४३-वाय-११०२) सकाळी जात होता. 

हेही वाचा -  दोन दिवसांनंतर नांदेडला पुन्हा धक्का, एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, संख्या गेली ९८ वर

या अपघातात जीवीत हानी नाही

देशी दारुचा माल वेळेत उमरी येथे पाठविण्यासाठी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भेरधाव वेगात घेऊन जात होता. मात्र जामगाव पाटीजवळ रस्‍त्याच्या एका वळणावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. यात ट्रक रस्त्याच्या कडेला जावून पलटला. या अपघातात बरेच दारुचे बॉक्स फुटले. सर्वत्र देशी दारुचा वास दरवळवत होता. ही माहिती मिळताच जामगावचे तरूण ट्रकजवळ आले. पाहतात तर देशी दारुचे बॉक्स समोर पडलेले होते. ही संधी साधून अनेकांनी देशी दारुचे बॉक्स लंपास केले. ऐन कडकीच्या काळात घराजवळ फुकट दारु आल्याने अनेकांनी चांगलाच हात साफ करुन घेतला.

सव्वासे बॉक्स केले लंपास 

काही वेळाने उमरी पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनीही तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठले. पोलिस येईपर्यंत बराच देशीचा माल गायब झाला होता. ४१४ बॉक्स पैकी २७५ बॉक्स घटनास्थळावर दिसले. उर्वरीत त्यातील काही दारु फुटून वाया गेली तर काही तळीरामानी लंपास केली. त्यानंतर देशी दारु मालकाला बोलावून घेऊन राहिलेला देशी दारुचा माल अन्य वाहनातून उमरीत नेण्यात आला. 
लॉकडाउनमध्ये तब्बल दोन महिणे वनवासात असलेल्या तळीरामांना मंगळवारचा दिवस सोन्याचा उजाडला. त्यांच्या स्वप्नातही नसेल की घराजवळ अगदी मोफत दारु भेटेल म्हणून. मात्र दुर्दैवाने दारु घएऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला आणि त्यात तळीकरामांचे चांगलेच फावल्याचे बोलल्या जाते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The liquor truck overturned, so what Take the box away nanded news