साहित्य परिषदेतर्फे साहित्यिक प्राचार्य ग.पी. मनूरकर यांना आदरांजली

file photo
file photo

नांदेड : मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य ग.पि. मनूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य हे होते. प्रारंभी साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी शोक प्रस्ताव ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश मोरे यांनी केले. काही क्षण मौन धारण करून मनूरकरांना आदरांजली वाहण्यात आली. शोकसभेत खालील मान्यवरांनी ग.पि. मनूरकरांप्रती संवेदना प्रगट केल्या. सामाजिक अंतराचे नियम पाळून निवडक रसिकांनी ग.पि. मनूरकर सरांना आदरांजली वाहिली

डॉ. हंसराज वैद्य - मनूरकर सर हे आमचे गुरू होते. त्यांचे बोट धरून आम्ही साहित्याच्या क्षेत्रात चालू लागलो. यापुढे त्यांची उणीव आम्हाला सदैव जाणवत राहील.

प्रभाकर कानडखेडकर - मराठवाडी भाषेतून आपल्या बोली वाक्‌प्रचारांचा उपयोग करणारे आणि माणुसकी जपणारे दलितमित्र मनूरकर आज आपल्यात नाहीत. वयाच्या पंच्याहतरीमध्ये अंदमान येथे विश्व साहित्य संमेलनात हजेरी लावणारे मनूरकर सरांना मी अभिवादन करतो.

देवीदास फुलारी - विविध वाङ्‌मयप्रकारात मनूरकर सरांनी पंधरा ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील अनेक ग्रंथांचे शीर्षक आणि पाठराखण मीच केलेली आहे. मानवतावादी मनूरकर सर हे शुभ्र कपडे परिधान करणारे स्वच्छ आणि पारदर्शी साहित्यिक होते.

महेश मोरे - ग्रामीण बोलीभाषा जिवंत ठेवण्याचे काम मनूरकर सरांनी केले. त्यांच्या प्रेरणेमुळे मी घडलो. त्यांच्यासोबत भटकंती केली.

जयवंत पाटील मनूरकर - गणपत हा माझा सवंगडी होता. इहलोकीची यात्रा सोडून तो निघून गेला आहे. त्याच्या जाण्यामुळे आमच्या गावचे न भरून निघणारे नुकसान झाले.

दिगंबर कदम - मनूरकर सर हे साहित्यिकांचे पितामह होते. त्यांनी उभी केलेली यशवंत शाळेची इमारत आणि मनूर येथील वाचनालय हे त्यांची स्मृती मंदिरे होत.

निर्मलकुमार सूर्यवंशी - 1986 साली मनूरकर सरांचा गुडबाय हा कथासंग्रह मी प्रकाशित केला, तेव्हापासून त्यांची माझी मैत्री होती. ग्रामीण भागात लेखक, डॉक्टर, इंजिनीअर निर्माण करणारा निर्माता गेला.

देवदत्त साने - मनूरकर म्हणजे उत्कृष्ट कथाकथन करण्याचा वस्तुपाठ होते. त्यांचे लेखन म्हणजे ग्रामीण परिसरातील जीवन, ग्रामीण ढंगात मांडणारे होते.

विजय बंडेवार - नवोदित साहित्यिकांसाठी दीपस्तंभ ठरलेले मनूरकर सर यांचे साहित्य म्हणजे जीवनाचे यथार्थ दर्शन होय.

डॉ. जगदीश कदम - मनूरकर सर हे कुरूंदकर मिशनचे विद्यार्थी होते, त्या अर्थाने ते आमचे गुरूबंधू होते. त्यांच्या संवादशैलीला खास मनूरकरी टच होता.

माधव चुकेवाड - मनूरकर सरांच्या निधनाने एक निर्मळ आणि प्रेमळ माणूस आपल्यातून गेला आहे. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा नांदेड यांच्यावतीने मी त्यांना आदरांजली वाहतो.

स्वाती कान्हेगावकर - मनूरकर सर म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा होते. ग्रामीण मराठी भाषेचा गोडवा त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत असे.

शिवा कांबळे - मनूरकर सरांच्या निधनाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरून न निघणारी हानी झालेली आहे.

निळकंठ पाचंगे - ग्रामीण मातीशी नाळ जुळलेल्या मनूरकर सरांनी आपल्या परीसस्पर्शाने अनेक साहित्यिकांचे सोने केले.

राहुल नेत्रगावकर -उच्च विद्याविभूषित मनूरकर सरांनी अनेक विद्यार्थी घडविले आणि सुसंस्कृत समाज निर्माण केला.

राम शेळके - मनूरकर सर हे धोती आणि शर्ट या ग्रामीण वेशात राहात असत, त्यांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com