लॉकडाऊन : ४० दिवसात ६७ लाखाचा मुद्देमाल जप्त...कुठे ते वाचा...

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 6 मे 2020

६७ लाख १५ हजाराचा बेकायदेशीर गुटखा व अवैध दारु जप्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व ठाणेदारांनी कारवाई केली.

नांदेड : लॉकडाउनच्या ४० दिवसांमध्ये नांदेड पोलिसांनी जिल्हाभरातून तब्बल ६७ लाख १५ हजाराचा बेकायदेशीर गुटखा व अवैध दारु जप्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व ठाणेदारांनी कारवाई केली. या दोन्ही कारवायामध्ये ४०० गुन्हे दाखल करून साडेचारशे आरोपींना अटक केली. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखत असतानाच स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांच्या पथकांनी लॉडडाउन काळात अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करत ६७ लाख १५ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मार्च महिन्यापासून शासनाने लॉकडाउन घोषित केलेला आहे. सदर लॉकडाउन काळात देशी- विदेशी दारू विक्रीचे दुकानांना विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या कालावधीत कोणीही चोरट्या मार्गाने अथवा इतर मार्गाने कोणत्याही प्रकारची दारु विक्री करु नये असे स्पष्ट आदेश आहेत. 

हेही वाचा - Video : नांदेड शहरात केला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान, कशासाठी? ते वाचाच

ता. २२ मार्च ते ता. ३० एप्रिल

परंतु मध्यरात्री अवैध दारु व गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करत जिल्हाभरात पोलीस दलाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ता. २२ मार्च ते ता. ३० एप्रिल दरम्यान केलेली कामगिरी.

दारूबंदी अधिनियमाखाली कारवाई

जिल्ह्यात विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशी- विदेशी, हातभट्टी आणि शिंदी इत्यादींमध्ये अवैधपणे विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करत ३९० गुन्हे दाखल करून ४४० आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सतरा लाख तीन हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

येथे क्लिक करा - ‘त्या’ चार पॉझिटीव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्री कारवाई 

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पान मसाला अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून चार आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून ५० लाख ११ हजार ६०० रुपयांचा गुटखा व सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी छापे मारून ६७ लाख १५ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: 67 lakh items seized in 40 days Nanded news