esakal | लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हजारो परप्रांतीयांनी नांदेड सोडताना आपले किरायाचे घर व दुकानेही खाली केल्याने शेकडो मालमत्ताधारकांना आता नवीन भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे.

लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे हाताला काम राहिले नसल्याने हजारो परप्रांतीयांनी नांदेड सोडताना आपले किरायाचे घर व दुकानेही खाली केल्याने शेकडो मालमत्ताधारकांना आता नवीन भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. भलेमोठे घर आता एका गोदामासारखे दिसत असल्याने घरमालक भाडेकरुंच्या शोधात आहेत. 

परप्रांतीय भाड्याच्या घरात राहून वेगवेगळे व्यवसाय व कामाच्या माध्यमातून आपले व आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह करत होते. पण त्यामुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने या परप्रांतीयांनी आपल्या राज्याची वाट धरली असून त्यामुळे भाड्याची शेकडो घरे रिकामी झाली आहेत. रोजगारच नसल्याने भाडे कुठून भरावे असा प्रश्न या परप्रांतीयासमोर उभा असताना त्यांनी घर सोडल्यानंतर आता भाडेकरू पाहिजे असे म्हणायची वेळ या मालमत्ताधारकांवर आली आहे. ही परिस्थिती संबंध राज्यभर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

हेही वाचा -  नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

कामगार व किरायदारांनी जडअंतकरणाने शहर सोडले

लॉकडाऊनचा जबर फटका परप्रांतीय कामगार व लघु व्यावसायिकांना बसला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी आहे तिथेच राहण्याचा सल्ला दिला असला तरी रोजगाराविना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा आपले गाव गाठावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि जडअंतकरणाने शहर सोडले. नांदेड शहराचा विचार केला तर पावभाजी विक्रीचा पूर्ण व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बंगालचे हजारो कामगार आणि कारागीर गेल्या एक वर्षापासून शहरात आले होते. यापैकी काही गुजराती, राजस्थानी कामगारांनी स्वतःचा व्यवसाय येथे सुरू करून आपला जम बसविला असला तरी प्रत्येकाला असे करता आले नाही.

घरमालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ 

पगारी कामगार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी शहराच्या विविध भागात भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. परंतु रोजगारच नसल्याने त्यांना परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घराचे भाडे कुठून द्यावे, परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने हजारो कामगारांनी नांदेड सोडण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या कालावधीत काहींनी खासगी वाहने करून आपले घर जवळ केले तर अलीकडे काहींना रेल्वेचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाड्याची घरे रिकामी झाली आहे. ती रिकामी घरे पाहून घरमालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. 

येथे क्लिक करा Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी

नवीन भाडेकरू शोधूनही सापडत नाही

नवीन भाडेकरू शोधूनही सापडत नसल्याने टोलेजंग इमारतीचे मेंटेनन्स, कर भरणा कशाने करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. बऱ्याच जणांनी टोलेजंग इमारती बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. आता कोरोनाची ही साथ केंव्हा संपुष्टात येईल हे निश्चित नसताना इमारतही रिकाम्या झाल्याने त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर घाव बसला आहे. यामुळे भाडेकरू पाहिजे असे म्हणायची वेळ आली आहे. एवढे मात्र निश्चित आहे.