नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

शिवचरण वावळे
Monday, 1 June 2020

सोमवारी (ता. एक) पुन्हा नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील असून शिवाजीनगर भागात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण तर देगलूर नाका परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत.

नांदेड : मुंबईहून प्रवास करून आलेल्या मुखेड तालुक्यातील दोन रुग्णांचे रिपोर्ट रविवारी (ता. ३१) पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी (ता. एक) पुन्हा नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील असून शिवाजीनगर भागात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण तर देगलूर नाका परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

शनिवारी (ता. ३०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १५२ नमुन्यांपैकी रविवारी (ता. ३१) संध्याकाळपर्यंत तीस अहवाल प्राप्त झाले. रविवारी संध्याकाळी पुन्हा ६५ नमुने अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी सोमवारी (ता. एक) सकाळी ४३ अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक रिपोर्ट हा अनिर्णीत ठेवण्यात आला आहे. पॉझिटिव आढळून आलेले रुग्ण देगलूर नाका भागातील ४५ व २५ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. तर शिवाजीनगर भागातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

हेही वाचा -  क्वारंटाईन कक्षात तपासणी करणाऱ्या आशांना धमकी

जिल्ह्यातील संख्या पोहचली १४९ वर

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १४९ इतकी झाली आहे. तर उपचारादरम्यान प्रतिसाद न दिल्याने आत्तापर्यंत आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झालेल्या १०४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण 

मागील दोन महिन्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवाजीनगर, वजिराबाद, श्रीनगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. परंतु मागील आठवडाभरापासून बाजारपेठ हळूहळू सुरू होत असतानाच शिवाजीनगरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीच्या व बाजारपेठ असलेल्या परिसरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा बाजारपेठेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

येथे क्लिक करा - Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी

एक लाख ३९ हजार ६४७ जणांचे सर्वे

रविवारी संध्याकाळपर्यंत एक लाख ३९ हजार ६४७ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर तिन हजार ८९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आले आहेत. यातील तीन हजार ३७८ जनांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedian was given a shock on Monday, again adding three positive patients nanded news