लॉकडाऊनचे उल्लंघन- नांदेड जिल्ह्यात ९६१ गुन्हे दाखल

प्रल्हाद कांबळे
Thursday, 30 April 2020

लॉकडाउनचे उल्लंघन केलेल्यांविरुद्ध जिल्‍ह्यात ९६१ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध विभागाची शहराच्या इस्लामपूरा परिसरात गुरूवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमारास कारवाई. साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त. इतवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक. 

नांदेड : कोरोना या वैश्‍विक महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस, जिल्हा प्रशासनासह सर्वच नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनचे उल्लंघन न करता कामाशिवाय घरातून बाहेर पडणे म्हणजे गंभीर समस्येला तोंड देण्यासारखे आहे. सर्वांनी एकजूट होऊन या महामारीवर नियंत्रण मिळवायचे आहे. मात्र जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या लोकांवर विविध पोलिस ठाण्यात ९६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने आपले हातपाय पसरून हाहाकार माजविला आहे. महासत्ता असलेले देश या आजारापूढे हतबल झाले आहेत. ही परिस्थिती सध्या आपल्याकडे जरी नसली तरी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. अत्यावश्‍यक काम असले तरच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका. पोलिस आपल्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून कळकळीने आपणास सांगत आहेत. ही लढाई एकट्या पोलिस किंवा प्रशासनाची नाही. ती आपणा सर्वांची असल्याने प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन जर आपण घरी थांबलो तर नक्कीच ही लढाई जिंकु असा विश्‍वास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि विजय पवार यांनी व्यक्त केला. 

पोलिसांचा रोष पत्करुन घेऊ नका

महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीने दिवसभर बाहेर राहिल्यानंतर घरी जाताच आपले कपडे व हातपाय धुवूनच घरात प्रवेश केल्यानंतर स्नान करणे आवश्‍यक आहे. जर कुठली वस्तु घरात आणली तर तिलाही सॅनीटायझर करा. पोलिस व महसुल प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा तसेच घराबाहेर पडून पोलिसांचा रोष पत्करुन घेऊ नका. असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 

हेही वाचाCorona : रिपोर्ट निगेटिव्ह, पण नांदेडमध्ये रुग्णाचा मृत्यू

गुटख्यासह साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिसरात अवैध मार्गाने राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा सर्रासपणे काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत गुटखा व वाहतुक करणारे वाहन असा आठ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास इस्लामपूरा भागात केली. 

देगलूर नाका व जुने नांदेड परिसरात आणि संबंध जिल्हाभरात राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुंगधीत सुपारी हे अन्नपदार्थ काळ्या बाजारात सर्रास चढ्या दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी सोशल माध्यमाद्वारे प्रशासनाकडे जात होत्या. देगलूर नाका परिसरात अवैध धंदे ज्यात गुटखा व मटका खुलेआम चालतात. याकडे पोलिस विभाग व अन्न व औषध प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप होत होता. मात्र या विभागातील काही अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी कान टोचल्यानंतर गुरूवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास इस्लामपूरा भागात छापा टाकला.

आठ लाख ६४ हजाराचा मुद्मेमाल जप्त 

यावेळी केशरयुक्त वजीर या गुटख्याचे १८ पोते, सितार मावाचे ४० पोते आणि (एमएच०४-एफजे- ४३७) हे चारचाकी वाहन असा आठ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी शेख अकबर, शेख खाजामिया आणि शेख मुबीन या तिघांना ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. गीते करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Violation - 961 Cases Registered In Nanded district