esakal | Corona : रिपोर्ट निगेटिव्ह, पण नांदेडमध्ये रुग्णाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

जिल्ह्यातील पहिला रुग्ण लवकरच कोरोनामुक्त होईल, असे सर्वांनाच वाटत असतानाच, त्याचा गुरुवारी मृत्यु झाल्याने नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

Corona : रिपोर्ट निगेटिव्ह, पण नांदेडमध्ये रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : शहरात महापालिका हद्दीतील पीरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीस ‘कोरोना’ची लागण झाली. त्यानंतर या ‘कोरोना’ बाधीत रुग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी (ता. ३० एप्रिल) त्याचा मृत्यू झाला.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आले होते. मात्र, ता. २२ एप्रिलपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. ‘लॉकडाउन’ला एक महिना पूर्ण होत असतानाच पीरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीस ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी (ता.२९ एप्रिल) त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण लवकरच कोरोनामुक्त होईल, असे सर्वांनाच वाटत असतानाच, त्याचा गुरुवारी मृत्यु झाल्याने नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - ‘त्या’ महिलेमुळे सेलू व परभणीतील ६१ जण कॉरन्टाईन

पीरबुऱ्हाणनगर येथील ‘कोरोना’ बाधीत व्यक्ती मधुमेह, उच्च रक्तदाब, श्‍वसनाचा आजार होता. दरम्यानच्या काळात त्याला अधिकचा त्रास होत असल्याने तो स्वतःहून ता. २० एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्या घशातील लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. बुधवारी सकाळीच त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. पहिल्या दिवसापासून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. अखेर या रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता आता अधिकच वाढली आहे.  

हे देखील वाचाच - नांदेडात घुसलेले पंजाबचे नऊ कामगार क्वारंटाईन

दरम्यानच्या काळात नांदेड शहरात अबचलनगर आणि सेलू (जि.परभणी) येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अबचलनगर येथील रुग्ण शीख भाविकांना घेऊन पंजाबला गेला होता. तेथून परत आल्यानंतर तपासणी केली असता, तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर सेलू येथील महिला गंभीर आजाराने त्रस्त असल्याने, बुधवारी तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले. मात्र, त्यातील एकाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने आता दोन रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने सांगितले.